नेपाळमध्ये विमान कोसळले : आतापर्यंत ७२ पैकी ६२ जणांचे मृतदेह सापडले !

काठमांडू (नेपाळ) – ‘यती एअरलाईन्स’चे ‘एटीआर्-७२’ हे विमान १५ जानेवारीला सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नेपाळमधील पोखरा विमानतळावर उतरत असतांना डोंगराला धडकून दरीत कोसळून त्याला आग लागली. या विमानात ६८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. यातील ६२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरितांचा शोध चालू आहे. ‘यती एअरलाइन्स’चे प्रवक्ते सुदर्शन बरतौला म्हणाले, ‘‘या अपघातानंतर आतापर्यंत विमानातील एकाही व्यक्तीला जिवंत बाहेर काढता आलेले नाही.’’ येथे साहाय्यता कार्य करणार्‍यांच्या मते विमानातील सर्वच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी अपघातानंतर मंत्रीमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली. यासह घटनास्थळी सैन्यालाही पाठवण्यात आले. सैन्याकडून आता तेथे साहाय्यता कार्य केले जात आहे.

१. विमानातील ६८ प्रवाशांत नेपाळचे ५३, भारताचे ५, रशियाचे ४, आर्यलँडचा १, दक्षिण कोरियाचे २, फ्रान्सचा १, अफगाणिस्तानचा १, तर इतर १ यांचा समावेश होता. यांमध्ये ३ नवजात बालके आणि ३ मुले यांचाही समावेश होता.

२. नेपाळमध्ये गतवर्षी मे मासातही विमान कोसळले होते. त्यात १९ प्रवाशांसह ३ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. यात ४ भारतियांचाही समावेश होता.