शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांच्यावरील ‘इस्रो’च्या हेरगिरीचे आरोप खोटे !

  • सीबीआयची केरळ उच्च न्यायालयात माहिती

  • नारायणन् यांना अडकवणे, हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असल्याचा सीबीआयचा दावा

शास्त्रज्ञ नंबी नारायणन् (डावीकडे)

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’मधील वर्ष १९९४ मधील कथित हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांची अटक अवैध होती, या घटनेत कुठलीही वैज्ञानिक माहिती उघड झाली नाही. त्यांना खोट्या हेरगिरी प्रकरणात त्यांना अडकवण्यात आले. हेरगिरी प्रकरणात नंबी नारायणन् यांना अडकवण्याचा आंतरराष्ट्रीय कट होता, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) १३ जानेवारी या दिवशी केरळ उच्च न्यायालयात दिली. नंबी नारायणन् हे इस्रोमधील प्रमुख ‘लिक्विड प्रोपेलंट इंजिन’ वैज्ञानिक होते.

१. नंबी नारायणन् यांना हेरगिरी प्रकरणात गोवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी मालदीवच्या नागरिकाच्या माध्यमातून पाकिस्तानला ‘क्रायोजेनिक इंजिन’ तंत्रज्ञान विकल्याचा आरोप होता. वर्ष १९९८ मध्ये सीबीआय न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी नारायणन् यांची निर्दोष मुक्तता केली होती; पण त्या काळात त्यांनी सहयोगी शास्त्रज्ञ डी. शशीकुमार आणि इतर ४ जणांसह ५० दिवस कारागृहात घालवले.

२. या खोट्या प्रकरणातून नंबी नारायणन् यांना त्यांचे नाव पूर्णपणे काढून टाकायचे होते. यासह त्यांनी हानीभरपाईसाठी आणि त्यांना फसवणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईसाठी कायदेशीर लढाईही लढली. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये आरोप केला आहे की, ज्या कटकारस्थानांची आणि लोकांची आता चौकशी केली जात आहे, ते अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ समवेत भारताच्या अंतराळ कार्यक्रमात अडथळा आणण्यासाठी काम करत होते.

३. नंबी नारायणन् यांनी त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेते आर् माधवन यांनी नंबी यांच्या आयुष्यावर चित्रपटही काढला. त्यात नंबी यांच्या आयुष्यातील संपूर्ण संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि अभिनय माधवन यांनीच केला आहे. हा चित्रपट आता ऑस्कर २०२३ साठी पाठवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

नंबी नारायणन् यांना खोट्या आरोपाखाली अडकवणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून खटला चालवला पाहिजे आणि त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे !