ब्रिटनमधील आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर लावले देवीचे चित्र असलेले स्टिकर !

संतप्त हिंदूंकडून उत्पादन मागे घेण्याची मागणी !

“हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक”

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील ‘बी.एन. मंगर’ या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर देवीचे चित्र असलेले स्टिकर लावले आहे. यामुळे हिंदूंनी आस्थापनाचा निषेध करत ‘हे उत्पादन मागे घेऊन सदर स्टिकर हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी हिंदूंनी दिली आहे. ब्रिटनमधील हिंदू आणि भारतीय यांच्याशी संबंधित समस्यांवर आवाज उठवणार्‍या ‘इनसाइट यूके’ या सामाजिक माध्यमांवरील मंचाने याविषयीची माहिती दिली.

यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये फ्रान्समधील ग्रेनेड-सुर-गोरोन नावाच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने ‘शिवा बिअर’ बाजारात आणली होती. त्यालाही हिंदूंनी विरोध केला होता. वर्ष २०१८ मध्ये डर्बीशायर नावाच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाने बिअरच्या बाटलीवर श्री कालीमातेचे चित्र असलेले स्टिकर लावले होते. त्यासही हिंदु संघटनांनी विरोध केला होता.

संपादकीय भूमिका

अशा घटनांना स्थानिक हिंदू, तसेच भारतातील हिंदु संघटना विरोध करत असल्या, तरी भारत सरकारने यासंदर्भात विरोध करून संबंधित आस्थापनांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !