॥ श्रीकृष्णाय नम: ॥
‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात’, ह्या आधी लिहीलेल्या लेखात गीता आणि उपनिषदांनी सांगितलेले कर्मफळे नष्ट करण्याचे उपाय स्पष्ट केले आहेत. ते श्रुतीग्रंथांवर आधारित आहेत. त्या व्यतिरिक्त काही स्मृतीग्रंथांमध्ये पापकर्मांची फळे नष्ट करण्यासाठी प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत. त्या ‘प्रायश्चित्ते’ ह्या विषयावर थोडे विवेचन पुढे केले आहे.
१. पापांच्या परिणामस्वरूप पुढे खूप पीडा भोगाव्या लागतात. वेगवेगळ्या पापांची अशी फळे नष्ट करण्यासाठी वेगवेगळी प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत. ही प्रायश्चित्ते खूपच कठोर आहेत.
२. घडलेल्या पापामुळे पुढे जो त्रास भोगावा लागणार, तो संकल्प करून कठोर प्रायश्चित्त घेऊन भोगला जातो; त्यामुळे त्या पापकर्माचे फळ संपते.
३. प्रत्येक पापावर वेगळे प्रायश्चित्त सांगितलेले असल्याने ज्या पापाचे प्रायश्चित्त घेतले, केवळ त्याच पापाचे फळ संपेल. आणखी काही पापे केली असतील तर त्यांची आणि आधींच्या जन्मांतील भोगणे बाकी असलेल्या पापांची फळे नष्ट होेणार नाहीत, ती पुढे भोगणे शिल्लक राहील. आधीच्या जन्मांतील फळे भोगणे बाकी असलेल्या पापांवर प्रायश्चित्ते घेऊसुद्धा शकणार नाही कारण ते संचित कोणत्या पापांचे आहे, हे कळण्याचा मार्ग नाही. (‘आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात’ ह्या आधी लिहीलेल्या लेखात सांगितलेल्या मार्गाने आधीच्या सर्व जन्मांची आणि आताच्या जन्माची सगळी पुण्य-पापरूपी फळे एकत्रच नष्ट होतात.)
४. प्रायश्चित्त आपल्या मनाने न ठरविता मनुस्मृती आणि अन्य शास्त्रांमध्ये सांगितलेलेच प्रायश्चित्त घेणे योग्य राहील.
५. महत्त्वाची गोष्ट ही आहे की घेतलेल्या प्रायश्चित्ताने त्या एका पापाचे भोगावे लागणारे फळ नष्ट होईल; पण मनाची प्रवृत्ती सुधारत नाही, पाप करण्याची प्रवृत्ती नष्ट होत नाही. पापकर्मे करण्याचा विचारच मनात येऊ नये, ह्यासाठी निर्धाराने वेगळे प्रयत्न करावे लागतात. भक्तीयोग, ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग इत्यादी अनेक योगांपैकी एक किंवा त्या बरोबरच आणखी योग करून प्रवृत्ती पालटते, सुधारते आणि मनाने निवृत्ती होते, जी मोक्षप्रद आहे.
टीप – सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या साधकांसाठी – पाप आणि चूक ह्यात अंतर असते. सनातन संस्था साधकांना चुकांवर प्रायश्चित्त घ्यायला सांगते, तो विषय वेगळा आहे. त्याचा ह्या लेखाशी संबंध नाही. |
– अनंत आठवले. २८.०९.२०२२