भारत आणि चीन सीमेवर परिस्थिती तणावपूर्णच ! – सैन्यदलप्रमुख मनोज पांडे

सैन्यदलप्रमुख मनोज पांडे

नवी देहली – चीनच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावाखालीच आहे, असे विधान भारताचे सैन्यदलप्रमुख मनोज पांडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना सांगितले.

१. सैन्यदलप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती स्थिर आणि नियंत्रणात असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. येथे चीनकडून सैनिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली असली, तरी आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये फेब्रुवारी २०२१ पासून सीमेवर युद्धविराम आहे; परंतु सीमेपलीकडून आतंकवादाला सातत्याने पाठिंबा दिला जात आहे. तेथे आतंकवादाची पायाभूत सुविधा अजूनही अस्तित्वात आहे. त्यामुळे भारत सतर्क आहे. ईशान्येकडील अधिकतर राज्यात शांतता आहे. या राज्यांतील आर्थिक घडामोडी आणि विकासकामे यांमुळे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

२. जम्मूच्या राजौरी येथे आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य करून ठार केल्याच्या प्रकरणावरन मनोज पांडे म्हटले की, आपला शत्रू लक्ष्यित हत्या करत आहे. पीर पंजाल भागाच्या दक्षिणेकडे अल्पसंख्यांकांच्या विरोधात लक्ष्यित हत्या केली जात आहे. येथे घुसखोरी अधिक प्रमाणात होत आहे. ड्रोनच्या साहाय्याने सीमा सुरक्षा दल आणि भारतीय सैन्य ती रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

३. सैन्यदलप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, लवकरच भारतीय सैन्याच्या ‘कोअर ऑफ आर्टिलरी’मध्ये महिला अधिकार्‍यांचा समावेश केला जाईल. यासंदर्भात आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून तो लवकरच स्वीकारला जाईल, अशी आशा आहे.

जोशीमठ गावामध्ये सैन्याची २५ ठिकाणे केली रिकामी !

उत्तराखंडच्या जोशीमठ येथे भूस्खलनामुळे घरे आणि अन्य बांधकामे यांना तडे जात आहेत. त्यात सैन्याचीही ठिकाणे आहेत. सैन्याच्या २५ ते २८ ठिकाणांना तडे गेल्याने तेथे तैनात सैनिकांना दुसरीकडे स्थलांतरित करून जागा रिकामी करण्यात आली आहे. याविषयी सैन्यदलप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, आम्ही तात्पुरत्या स्वरूपात सैनिकांना स्थलांतरित केले आहे. आवश्यकता वाटल्यास आम्ही ओली येथे सैनिकांना कायमस्वरूपी तैनात करू. जोशीमठ येथून माणा येथे जाणार्‍या मार्गावर तडे गेले आहेत. हा मार्ग आम्ही दुरुस्त करत आहोत.