रशियाने युक्रेनसमवेतचे युद्ध जिंकण्यासाठी सैन्यदलप्रमुख पालटला !

जनरल सेर्गेई सुरोविकिन (डावीकडे) जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह (उजवीकडे)

मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण अद्यापही चालू आहे. याला १ वर्ष पूर्ण होत असतांना रशियाने त्याच्या सैन्यदलप्रमुखांना पालटले आहे. जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह हे नवे सैन्यदलप्रमुख असणार आहेत. या युद्धामध्ये रशियाची हानी होत असल्याने आणि रशियाने युक्रेनचे जिंकलेले प्रदेश तो रशियाकडून पुन्हा मिळवत असल्याने हा पालट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हॅलेरी गेरासिमोव्ह हे रशियाचे तिन्ही दलांचे प्रमुखही आहेत. वर्ष २०१२ पासून ते या पदावर आहेत. सेर्गेई सुरोविकिन यांच्या जागी ते आता युक्रेन युद्धाची संपूर्ण दायित्व घेणार आहेत. सुरोविकिन हे गेल्या ३ मासांपासून या युद्धाचे नेतृत्व करत होते.

१. मॉस्कोस्थित एका तज्ञाने ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीला सांगितले की, तिन्ही दलांच्या प्रमुखाने स्वतः युक्रेन युद्धाचे नेतृत्व करणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. आता युद्ध मोठे आणि धोकादायक होणार आहे.

२. दुसरीकडे रशियातील अनेकांचे असे म्हणणे आहे की, युद्धातील रशियाच्या अलीकडील पराभवाचे दायित्व सुरोविकिन यांच्यावर टाकले जात आहे.