कर्नाटकात शाळेत मुलांना धार्मिक शिक्षण आणि सात्त्विक आहार देणार !

बेंगळुरू – कर्नाटकात शाळेत मुलांना धार्मिक शिक्षण आणि सात्त्विक आहार देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील नैतिक शिक्षणाच्या वर्गांमध्ये धार्मिक ग्रंथांची माहिती देण्याविषयी चर्चा चालू आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ते चालू करण्याविषयी प्रयत्न करणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले.

१. अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणाचा समावेश करण्यासाठी ९ जानेवारी २०२३ या दिवशी बेंगळुरूमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री बी.सी. नागेश आणि श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

२. या बैठकीत बी.सी. नागेश यांनी अभ्यासक्रमात पालट करण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या सूत्रांच्या आधारे मूल्यशिक्षण राबविण्याविषयी विभागीय स्तरावरील बैठकांमध्ये चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

३. ‘या बैठकीचा उद्देश मुलांचे  आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करणे, नैतिक मूल्ये आत्मसात करणे आणि देवाची भक्ती शिकवणे हा होता’, असे बी.सी. नागेश यांनी सांगितले. शाळांमध्ये सात्त्विक आहार चालू करण्याविषयी या बैठकीत विचार करण्यात आला.