बक्सर (बिहार) येथील औष्णिक वीज प्रकल्पाचा विरोध करणार्‍या ग्रामस्थांना पोलिसांकडून अमानुष मारहाण !

संतप्त ग्रामस्थांकडून पोलिसांवर काठ्या आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण

बक्सर (बिहार) – येथील औष्णिक वीज प्रकल्पासाठी भूमी संपादनाला विरोध करतांना ग्रामस्थांनी पोलीस आणि येथील वीज केंद्र यांवर काठ्या आणि लोखंडी सळ्या यांद्वारे आक्रमण केले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारात ४ पोलीस घायाळ झाले. सध्या येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गेल्या ८५ दिवसांपासून ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. १० जानेवारीला ग्रामस्थांनी या प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून धरणे धरले. त्या वेळी पोलिसांनी काहीही केले नाही; मात्र रात्री पोलिसांनी ग्रामस्थांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण केली, तसेच ४ जणांना अटक केली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुसर्‍या दिवशी पोलिसांवर आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या जनतेला मारहाण केल्यावर जर जनतेचा उद्रेक होत असेल, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल ? जनतेला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !