गोवा : पिळर्ण औद्योगिक वसाहतीत रंग तयार करणार्‍या कारखान्याला भीषण आग

पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील ‘बर्जर बेकर कोटींग’ या कारखान्याला अचानक आग

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील ‘बर्जर बेकर कोटींग’ या रंग तयार करणार्‍या कारखान्याला १० जानेवारी या दिवशी दुपारी अचानक आग लागली. कारखान्यातील रंग आणि अन्य रसायन यांमुळे काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. कारखान्यातून स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. पिळर्ण येथून १२.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी पणजी येथूनही आगीचे लोट दिसत होते. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याने कारखान्यातील सर्व कामगार त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी टळली; मात्र एक कामगार या दुर्घटनेत घायाळ झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली. एक ट्रकही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती समोर आली आहे.

बार्देश तालुक्यात मागील १५ दिवसांत आग लागण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. कारखान्याला लागलेली आग इतरत्र पसरू नये, यासाठी अग्नीशमन दलाने योग्य दक्षता घेतली, तसेच या परिसरातील वीजपुरवठाही खंडित केला. कारखान्याच्या जवळील रस्त्यावरील वाहतूकही तातडीने बंद करण्यात आली. आग विझवण्यासाठी पिळर्ण, पर्वरी, म्हापसा, पणजी, कुंडई, फोंडा, कुडचडे आणि मडगाव येथील अग्नीशमन केंद्रांचे पाण्याचे बंब वापरण्यात आले.