देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती करतांना पू. सदाशिव परब (पू. भाऊकाका) यांच्या लाभलेल्या चैतन्यमय सत्संगाने साधकाला झालेले लाभ !

‘मागील काही मासांपासून पायाच्या समस्येमुळे मला जिन्याने वर-खाली करता येत नाही. त्यामुळे मला सेवेच्या ठिकाणी जाऊन सेवा करणे शक्य होत नाही. देवाच्या कृपेने मला आश्रमाच्या पहिल्या माळ्यावरील ध्यानमंदिरातील देवतांची पूजा करण्याची संधी मिळाली.

पू. सदाशिव परब

१. ध्यानमंदिरातील देवतांची पूजा केल्यावर आरती करतांना टाळ वाजवणारा साधक उपस्थित नसल्याने मला स्वतःलाच सर्व आरत्या म्हणाव्या लागत. त्यामुळे माझ्या मनात ‘आरतीची सेवा करणे मला एकट्याला शक्य होणार नाही’, असा विचार येऊ लागला.

२. गुरुकृपेने पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) आरतीसाठी नियमित येणे

श्री. सुरेश सावंत

गुरुकृपेने देवाला माझी दया येऊन पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) यांच्या माध्यमातून मला साहाय्य मिळाले. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच पू. भाऊकाका ध्यानमंदिरातील आरतीसाठी नियमित येऊ लागले. त्यांना टाळ वाजवता येत असल्याने माझी अडचण दूर झाली. संतांची दिव्य उपस्थिती लाभल्याने सर्व आरत्या चैतन्याच्या स्तरावर होऊन उपस्थित सर्व साधकांना त्याचा लाभ होऊ लागला.

३. पू. भाऊकाका यांच्या उपस्थितीने आलेल्या अनुभूती

अ. आरती चालू असतांना पू. भाऊकाका माझ्या डाव्या बाजूला उभे रहात. ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा झोत माझ्या दिशेने येत आहे’, असे मला जाणवायचे.

आ. माझ्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन मला स्थिर रहाता येऊ लागले.

४. कृतज्ञता

‘संतांच्या सत्संगाचा लाभ कसा होतो !’, हे परात्पर गुरुदेवांनी मला प्रत्यक्ष अनुभूती देऊन शिकवले. त्याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. पू. भाऊकाकांनी नवरात्रीच्या कालावधीत आरतीला उपस्थित राहून मला चैतन्यमय सत्संग दिला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुरेश सावंत (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक