पंजाबमध्ये गुंडांच्या गोळीबारात पोलीस हवालदार ठार

फगवाडा (पंजाब) – येथे वाहन चोरून पळणार्‍या गुंडांचा पाठलाग करतांना गुंडांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस हवालदार ठार झाला. कमल बाजवा असे त्यांचे नाव आहे. या घटनेनंतर फगवाडा पोलिसांनी याची माहिती फिल्लौर पोलिसांना दिली. फिल्लौरमध्ये नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांची या गुंडांशी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात ३ गुंडांना गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. त्यांचा चौथा साथीदार अंधाराचा अपलाभ घेत पळून गेला. अटक केलेल्या गुंडांची रणबीर, विष्णु आणि कुलविंदर अशी नावे आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंजाब शासनाने पोलीस हवालदार कमल बाजवा यांच्या कुटुंबियांना २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

फगवाडा येथील अर्बन इस्टेटमधील रहिवासी अवतार सिंह यांनी सांगितले, ‘मी आणि माझा मित्र माझ्या क्रेटा चारचाकी गाडीमधून घरी जात असताना आम्हाला गुंडांनी घेरले. गुंडांनी शस्त्रे दाखवून आम्हाला वाहनातून बाहेर येण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आणि गुंड आमची गाडी घेऊन पळाले. आम्ही तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग चालू केला. या वेळी झालेल्या चकमकीत बाजवा यांना गोळी लागली.’

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजून गुंडांच्या कारवाया वाढल्या आहेत, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले !