संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना येथे लंपी आजारामुळे ३ सहस्र ५०० जनावरांचा बळी !

४ जिल्‍ह्यांतील १ सहस्र ४९९ गावांतील ५२ सहस्र ५३१ जनावरांना लंपी आजार

लंपी चर्मरोगामुळे गायीच्या शरिरावर आलेले मोठ्या आकाराचे फोड

संभाजीनगर – राज्‍यातील लम्‍पीची परिस्‍थिती आटोक्‍यात असल्‍याचा दावा प्रशासनाकडून सतत करण्‍यात येत आहे; मात्र मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, परभणी आणि जालना या जिल्‍ह्यांत लंपी आजाराने १ सहस्र ४९९ गावे बाधित झाली असून ५२ सहस्र ५३१ जनावरांना लंपी आजार झाला आहे. या आजारामुळे ३ सहस्र ६७२ जनावरांचा मृत्‍यू झाला आहे.

लसीकरणानंतरही जनावरांना लंपी !

हा संसर्ग रोखण्‍यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवण्‍यात आली; मात्र लसीकरण केल्‍यानंतरही जनावरांना लंपी आजार होतांना दिसत आहे. यामध्‍ये गाय, बैल आणि वासरे यांचा समावेश आहे. या ४ जिल्‍ह्यांतील १ सहस्र ४९९ गावांमध्‍ये १७ लाख ७६ सहस्र ७३७ जनावरांचे पशूसंवर्धन विभागाकडून लसीकरण करण्‍यात आले आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र असे असतांनाही सद्यःस्‍थितीत ‘लंपी स्‍कीन’ या आजाराने या ४ जिल्‍ह्यांत ३ सहस्र ६७२ जनावरे मृत्‍यूमुखी पडली आहेत. या आजाराने ४ जिल्‍ह्यांत डोके वर काढल्‍याने शेतकर्‍यांच्‍या चिंतेत भर पडली आहे.

सरकारकडून जनावरांच्‍या मालकांना आर्थिक साहाय्‍य !

१ सहस्र ३६६ जनावरांच्‍या मालकांना सरकारच्‍या वतीने ३ कोटी ३१ लाख ८६ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्‍य देण्‍यात आले आहे.