नवग्रहांची उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व !

‘जीवनात येणार्‍या व्‍यक्‍तीगत समस्‍यांच्‍या निवारणासाठी व्‍यावहारिक प्रयत्नांना उपासनेची जोड देण्‍यास हिंदु धर्मात सांगितले आहे. आरोग्‍य, विद्या, बळ, सौख्‍य इत्‍यादींच्‍या प्राप्‍तीसाठी आणि व्‍याधी, पीडा, दुःख इत्‍यादींच्‍या नाशासाठी अनेक यज्ञ, मंत्र, यंत्रे, स्‍तोत्रे आदींचे विधान धार्मिक ग्रंथांमध्‍ये आहे. ज्‍योतिषशास्‍त्रानुसार ग्रहदोषांच्‍या निवारणासाठी ग्रहदेवतांची उपासना करण्‍यास सांगितले जाते. या उपासना करण्‍यामागील उद्देश आणि त्‍यांचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.

नवग्रह

१. नवग्रहांची उपासना करण्‍यामागील उद्देश

कु. मधुरा भोसले

१ अ. ग्रहांच्‍या सूक्ष्म ऊर्जेचा परिणाम मनुष्‍याच्‍या सूक्ष्मदेहावर होणे : आकाशात भ्रमण करणार्‍या तेजोगोलांमुळे आपल्‍याला काळ मोजता येतो. लौकिक दृष्‍टीने काळाचा अर्थ ‘अवधी’ असा असला, तरी फल-ज्‍योतिषशास्‍त्रात काळाचा ‘प्रारब्‍ध’ हा अर्थ अभिप्रेत आहे. प्रत्‍येक जीव त्‍याचे प्रारब्‍ध घेऊन जन्‍मतो. जिवाच्‍या जन्‍माच्‍या वेळी असलेल्‍या ग्रहस्‍थितीवरून त्‍याच्‍या प्रारब्‍धाचा बोध होतो. भारतीय ऋषींनी ग्रहांना केवळ भौतिक पदार्थ मानले नसून त्‍यांच्‍या ठायी असलेले ‘देवत्‍व’ जाणले. ‘देव’ म्‍हणजे जे प्रकाश (ऊर्जा) देतात ते. ग्रहांची स्‍थूल ऊर्जा म्‍हणजे त्‍यांची विद्युच्‍चुंबकीय शक्‍ती आणि सूक्ष्म ऊर्जा म्‍हणजे त्‍यांच्‍यात असलेले प्रधान तत्त्व (पृथ्‍वी, आप, तेज, वायू किंवा आकाश). ग्रहांची सूक्ष्म ऊर्जा जिवाच्‍या सूक्ष्मदेहावर (टीप) शुभाशुभ परिणाम करते. जिवाचा सूक्ष्मदेह त्‍याच्‍या स्‍थूलदेहाला प्रभावित करतो.

टीप – सूक्ष्मदेह : पंचसूक्ष्म-ज्ञानेंद्रिये, पंचसूक्ष्म-कर्मेंद्रिये, पंचसूक्ष्म-प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांनी जिवाचा ‘सूक्ष्मदेह’ बनतो.

१ आ. ग्रहांची उपासना केल्‍यामुळे व्‍यक्‍तीला आवश्‍यक असलेल्‍या सूक्ष्म ऊर्जेचा लाभ होणे : असे हे ग्रह जिवाच्‍या जन्‍माच्‍या वेळी अशुभ स्‍थितीत असता व्‍यक्‍तीत संबंधित सूक्ष्म ऊर्जेची न्‍यूनता असते. त्‍यामुळे तिला शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक स्‍वरूपाचे त्रास होतात. ‘व्‍यक्‍तीत अल्‍प असलेली सूक्ष्म ऊर्जा तिला प्राप्‍त व्‍हावी’, म्‍हणून संबंधित ग्रहांची उपासना करण्‍यास ज्‍योतिषशास्‍त्रात सांगितले आहे. ग्रहाशी संबंधित शांतीविधी, मंत्रजप, नामजप इत्‍यादी उपाय केल्‍यामुळे व्‍यक्‍तीला आवश्‍यक असलेल्‍या सूक्ष्म ऊर्जेचा लाभ होतो. प्रारब्‍धामुळे निर्माण झालेल्‍या समस्‍येचे निवारण करण्‍यासाठी आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्‍यात्मिक या तिन्‍ही स्‍तरांवरील उपाययोजना करणे आवश्‍यक असते. ग्रहांची उपासना करणे ही ‘आधिदैविक’ स्‍तरावरील (सूक्ष्म ऊर्जेच्‍या स्‍तरावरील) उपाययोजना आहे.

२. नवग्रहांच्‍या उपासनांचे प्रकार आणि त्‍यांचे महत्त्व

ग्रह-उपासनेच्‍या अंतर्गत ग्रहाशी संबंधित रत्न धारण करणे, यंत्राचे पूजन करणे, मंत्र किंवा स्‍तोत्र पठण करणे, हवन करणे, संबंधित देवतेचा नामजप करणे इत्‍यादी प्रकार आहेत. या उपासनांचे तौलनिक महत्त्व पुढील सारणीत दिले आहे.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२१)

२ अ. ग्रहाच्‍या अधिपती देवतेच्‍या नामजपामुळे आध्‍यात्मिक स्‍वरूपाचा त्रास अल्‍प होणे : वरील सारणीवरून लक्षात येते की, उपासनेचे स्‍वरूप जितके सूक्ष्म असेल, तितके लाभ होण्‍याचे प्रमाण अधिक असते. रत्न धारण करणे, हा सगुण स्‍तरावरील उपाय असल्‍याने त्‍याचा लाभ शारीरिक त्रासांच्‍या निवारणासाठी होतो. ग्रहाच्‍या यंत्राचे पूजन करणे आणि मंत्रजप करणे यांमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्‍यास साहाय्‍य होते. ‘ग्रहाच्‍या अधिपती देवतेचा नामजप करणे’ हा निर्गुण स्‍तरावरील उपाय असल्‍यामुळे आध्‍यात्मिक स्‍वरूपाचा त्रास (अतृप्‍त पूर्वजांचे त्रास, अनिष्‍ट शक्‍तींचे त्रास इत्‍यादी) दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

२ आ. उपासना श्रद्धेने, एकाग्रतेने आणि नियमितपणे करणे आवश्‍यक : कोणतीही उपासना श्रद्धेने करणे आवश्‍यक असते. श्रद्धापूर्वक केलेल्‍या उपासनेत मन, बुद्धी आणि चित्त यांचा सहभाग असतो. त्‍यामुळे उपासनेचा परिणाम सूक्ष्मदेहात खोलवर होतो. एकाग्रतेने आणि नियमितपणे केलेल्‍या उपासनेमुळे सूक्ष्मदेहावर झालेला परिणाम हळू-हळू स्‍थूलदेहावर दिसायला लागतो, तसेच परिस्‍थितीतही पालट होतो.

३. आधिभौतिक उपायांच्‍या जोडीला आधिदैविक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय अवलंबण्‍याचे महत्त्व

श्री. राज कर्वे

सध्‍याच्‍या काळात मनुष्‍याच्‍या जीवनातील ६५ टक्‍के घटना प्रारब्‍धामुळे घडतात. सततचे आजारपण, दीर्घ मुदतीच्‍या व्‍याधी, कौटुंबिक कलह, शैक्षणिक अपयश, आर्थिक चणचण, वैवाहिक सौख्‍य न लाभणे, अपघाताचे प्रसंग येणे यांसारखे दुःखद प्रसंग प्रारब्‍धामुळे घडतात. अशा समस्‍यांच्‍या निवारणासाठी भौतिक (स्‍थूल) उपाय योजण्‍यास मर्यादा येते. अशा समस्‍यांच्‍या निवारणासाठी आधिदैविक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांचा अवलंब करणे आवश्‍यक ठरते. आधिदैविक उपाय म्‍हणजे यज्ञ, मंत्रजप, नामजप आदी उपायांद्वारे आपल्‍यातील पंचतत्त्वांचे संतुलन साधून जीवन समृद्ध करणे. आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय म्‍हणजे जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यातून मुक्‍त होण्‍यासाठी गुरूंच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करणे. आधिदैविक उपाय ही सकाम साधना असून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय ही निष्‍काम साधना आहे. आध्‍यात्मिक साधनेमुळे जिवाच्‍या चित्तावरील संस्‍कार हळू-हळू लोप पावतात; ज्‍यामुळे सर्व दुःखांचे मूळच नाहीसे होते. त्‍यामुळे हिंदु धर्माने सांगितलेल्‍या जीवनपद्धतीत अध्‍यात्‍माला प्रधानता आहे.

सारांश, ‘ग्रह-उपासना’ हा आधिदैविक उपासनेचा एक प्रकार आहे. ग्रह-उपासनेद्वारे आपल्‍याला आवश्‍यक असलेली सूक्ष्म ऊर्जा मिळवता येते. प्रारब्‍धामुळे उद़्‍भवलेल्‍या समस्‍यांवर केवळ भौतिक (स्‍थूल) उपायांवर अवलंबून न रहाता आधिदैविक आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांची जोड देणे श्रेयस्‍कर आहे !’

– श्री. राज कर्वे, ज्‍योतिष विशारद, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२६.१२.२०२२)