रशिया-युक्रेन यांच्यामध्ये शांतता नांदण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ! – अमेरिका

वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्ध चालू आहे. याविषयी आम्ही भारतासह अन्य देशांच्या संपर्कात आहोत. या दोन्ही देशांमध्ये शांतता नांदण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असे वक्तव्य अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेस प्राईस यांनी केले आहे. ‘आजचे युग हे युद्धाचे नाही’, असे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या मताशीही अमेरिका सहमत आहे, असेही ते म्हराले. येथे  आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्राईस यांनी रशिया युक्रेनशी करत असलेल्या युद्धाविषयी चिंता व्यक्त केली.  ‘युक्रेनमधील विध्वंसाला रशियाला उत्तरदायी धरण्यासाठी काय करता येईल ?’, यासंदर्भात अमेरिका भारतासह इतर मित्र देशांच्या नियमित संपर्कात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘आंतरराष्ट्रीय स्थरावर शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारत आणि अमेरिका दोघेही कटीबद्ध आहेत. भारताने युक्रेनमधील नागरिकांना दिलेल्या पाठिंब्याचे आम्ही स्वागत करतो’, असेही ते म्हणाले.