मुंबई – ऊर्जा फाऊंडेशन आणि आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. ४ जानेवारी या दिवशी मुंबईतील दादर येथील हॉटेल कोहिनूर पार्क येथे हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रशासनाच्या आयुष मंत्रालयाच्या आरोग्य भारती आणि सल्लागार परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक कुमार वार्ष्णेय, मुंबई ग्राहक न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्रीमती स्नेहा म्हात्रे, डॉ. संतोष पांडे, डॉ. सुनील खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पोलीसदलात विशेष कामगिरी करणारे ठाणे शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबाशेट्टी, ‘२६/११’ च्या आतंकवादी आक्रमणातील आतंकवादी अजमल कसाब याची कबुली देऊन अन्वेषणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाविषयी सचिन म्हात्रे, सामाजिक कार्यासाठी पुणे येथील श्रीमती मीलन जंगम, सौ. सायली स्वामी, स्वदेशी सेनेचे अध्यक्ष प्रा. मदन दुबे, कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्यासाठी अधिवक्ता संतोष सावंत, कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मधुरा कुलकर्णी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांच्या माध्यमातून गरीब रुग्णांच्या सेवेसाठी झटणारे डॉ. नरसिंह कामत यांना, तर पत्रकारितेत विशेष योगदान दिल्याप्रकरणी ‘स्प्राऊट्स’ वृत्तपत्राचे संपादक श्री. उन्मेश गुजराती यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी ऊर्जा फाऊंडेशनच्या सामाजिक योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोककुमार वार्ष्णेय यांनी आयुष मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय जंगम (स्वामी) आणि त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन श्रीमती प्रिया अग्रवाल, तर ऊर्जा फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. वैभव देवगीरकर यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव अधिवक्ता दीपक देशमुख आणि स्वयंसेवक जगन्नाथ जंगम, महादेव जंगम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संचालन केले.
११ आणि १२ मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदेचे आयोजन करणार ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), अध्यक्ष, ऊर्जा फाऊंडेशन११ आणि १२ मार्च या दिवशी ऊर्जा फाऊंडेशन अन् नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद आयोजित करत आहेत. या परिषदेमध्ये जगभरातील सर्वांगीण आरोग्य सेवेच्या क्षेत्रात काम करणारे ५०० डॉक्टर आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. |