सध्याच्या युवकांसाठी ढाब्यावर टेबल न्यून पडत आहेत, हे खेदजनक ! – ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर

ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – सध्या मंदिरात जाणार्‍या युवकांची संख्या न्यून झाल्याने टाळ शिल्लक रहातात; मात्र त्याच युवकांसाठी ढाब्यावर टेबल न्यून पडत आहेत, अशी खंत संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांनी व्यक्त केली. ‘संत चोखामेळा समाधी मंदिर ट्रस्ट’च्या वतीने आयोजित ‘चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची’ याच्या प्रस्थान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी आमदार समाधान अवतडे होते.

या वेळी ह.भ.प. मोरे महाराज पुढे म्हणाले की, देशात अन्य प्रांतांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक संत जन्माला आले आहेत. समाज ज्ञानेश्वरी आणि गाथा यांचे वाचन करत राहील, तोपर्यंत समाजातील नैतिकता आणि अस्मिता जिवंत राहील. संतांचे विचार समाजात रुजावेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. १२ दिवसांत ७ जिल्ह्यांतून जाणार्‍या या वारीचा १२ जानेवारी या दिवशी देहूमध्ये समारोप होणार आहे.