सम्मेद शिखरजी (जिल्हा गिरीडीह, झारखंड) हे जैनांच्या आस्थेचे केंद्र, पर्यटनाचे नाही !

झारखंड सरकारने जैनांचे आस्थेचे ठिकाण सम्मेद शिखरजी पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या स्थानाचे धार्मिक महत्त्व आणि जैन समाजाच्या भावना या लेखातून मांडण्यात आल्या आहेत.

श्री. भरत जैन

संकलक – श्री. भरत जैन, ईश्वरपूर (जिल्हा सांगली)

जैनांसाठी पवित्र ठिकाण

ज्याप्रमाणे हिंदु धर्मात ४ पवित्र धाम आहेत, शिखांचे सुवर्ण मंदिर, गुरुद्वार पवित्र स्थळ मानले जाते, त्याप्रमाणे झारखंड राज्यामध्ये असलेले सम्मेद शिखरजी हे जैनांचे पवित्र धार्मिक स्थान मानले जाते. येथे १ सहस्र ३५० उंची (४ सहस्र ४३० फूट) असलेला पर्वत असून झारखंड राज्याचे हे सर्वांत उंचावर असलेले ठिकाण आहे. जैन धर्मानुसार व्यक्तीने आयुष्यात एकदा जरी शुद्ध अंत:करणाने सम्मेद शिखरजी तीर्थाची भावपूर्ण यात्रा केली, तर मृत्यूनंतर त्याला पशूयोनी आणि नरक मिळत नाही. इथे येऊन साधना केल्यास या संसारातील सर्व कर्मबंधनातून तो मुक्त होतो आणि पुढील ४९ जन्मापर्यंत कर्मबंधनातून मुक्त रहातो. या तीर्थक्षेत्राचे स्थानमाहात्म्य एवढे आहे की, येथील जंगलातील वाघ, सिंह आदी प्राण्यांमध्ये हिंसक वृत्ती पहायला मिळत नाही. म्हणूनच तीर्थयात्रीही येथे निर्भयतेने यात्रा करतात. जैन धर्मानुसार सम्मेद शिखरजी हे शाश्वत तीर्थ मानले जाते.

२० तीर्थंकरांना साधना करून निर्वाण म्हणजेच मोक्षप्राप्ती !

जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर आहेत. त्यांपैकी २० तीर्थंकरांना येथे साधना करून निर्वाणाची म्हणजेच मोक्षप्राप्ती झाली आहे. येथे असणार्‍या पर्वताच्या सभोवताली सहस्रावधी जैन मंदिरे असून शेकडो धर्मशाळा आणि समाजसेवेची केंद्रे आहेत. जैन परंपरेनुसार हे अहिंसक तीर्थ असून येथे मांस, मद्यपान इत्यादी अभक्ष पदार्थ वज्र्य आहेत. जैन धर्मीय लोक या पवित्र पर्वताला वंदन करतात. ते या पर्वतावरील स्वच्छता आणि पावित्र्य टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने पवित्र क्षेत्राची पवित्रता नष्ट होईल !

सध्याच्या झारखंड सरकारने पर्यटन विकासाच्या दृष्टीने व्यावसायिक हेतू ठेवून या पवित्र पर्वताची गणना पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याचे अध्यादेश काढले आहेत. वास्तविक संपूर्ण पर्वताचा भागच पवित्र क्षेत्र मानले जाते. सरकारच्या अध्यादेशाच्या परिच्छेद ३ मध्ये सम्मेद शिखरजी क्षेत्राला पर्यटन किंवा संवेदनशील पर्यटनस्थळ रूपाने विकसित करण्याची योजना विस्ताराने वर्णन करण्यात आली आहे. त्यामध्ये परिच्छेद ‘ब’नुसार झारखंड पर्यटन खात्यास ‘इको टुरिझम प्लान’ करण्यास अनुमती देण्यात आली आहे, तसेच ‘इको सेन्सिटिव्ह पार्ट’च्या बाहेर १ किलोमीटर अंतरावर उपाहारगृह आणि ‘रिसॉर्ट’ चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. याचसमवेत परिच्छेद ३ च्या उपपरिच्छेद १६ नुसार प्रदूषण न करणार्‍या उद्योगांना अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या कुक्कुट विक्रीची दुकाने राजरोस या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य नष्ट होण्यास निमित्त होतील.

पर्यटनस्थळाचा अध्यादेश रहित होईपर्यंत जैन समाज पाठपुरावा करील

संपूर्ण जगातील जैन धर्मीय लोकांना या निर्णयामुळे धक्का बसला आहे. या विरोधात अनेक जैन मुनींनी आवाज उठवला असून अनेक ठिकाणी अहिंसक आणि शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने करण्यात येत आहेत. २१ डिसेंबर २०२२ या दिवशी जैन लोकांनी ‘भारत बंद’ पाळला होता. केवळ आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून या पवित्र क्षेत्राचे परिवर्तन पर्यटन क्षेत्रामध्ये झाल्यास अल्पसंख्यांक असलेल्या जैन समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांची मोठी हानी होईल. सम्मेद शिखरजी ही जैनांची काशी असून याचे संरक्षण करणे, हे सामाजिक दायित्व जसे जैन समाजाचे आहे, तसे ते सरकारचेही आहे. जोपर्यंत सम्मेद शिखरजीचा पर्यटनस्थळ म्हणून रहित होत नाही, तोपर्यंत जैन समाज याचा शासनाकडे पाठपुरावा करणार यात काहीच शंका नाही.

– श्री. भरत जैन, ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २८.१२.२०२२