प्रसिद्ध कथाकार आणि आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांना हिंदु नाव सांगून एका तरुणाने बाँब फोडून ठार करण्याची धमकी दिली आहे, तसेच ‘निरंजनी आखाड्या’चे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्यासह अनेक संतांना विष देऊन मारण्याचा कट उघड झाला आहे. हिंदूंच्या संतांना ठार मारण्याचा जिहाद्यांचा जुनाच इतिहास राहिलेला आहे. मोगलांच्या काळात हिंदु आणि शीख संतांना ठार करण्यात आले होते. आताही अशा घटना आणि धमक्या समोर आल्यानंतर हिंदूंच्या संतांची सुरक्षा पुन्हा चर्चेला आली आहे. यापूर्वी उत्तरप्रदेशातील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांना मंदिरात जाऊन ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीच होती. या देशात हिंदु संत आणि नेते यांच्या हत्या झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा धमक्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. बंगालमध्ये भाजपच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. त्यापूर्वी केरळमध्येही अशाच प्रकारचे भाजप कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक यांच्या हत्या झालेल्या आहेत अन् होत आहेत. पूर्वी माकपवाले तेथे या हत्या घडवून आणत होते आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (‘पी.एफ्.आय.’चे) जिहादीही या कारवाया करत आहेत. कर्नाटकमध्येही पी.एफ्.आय. संघटनेने हिंदु कार्यकर्ते आणि नेते यांच्या हत्या केल्याचे समोर आले होते. या संघटनेवर बंदी घालण्यात आली, तरी त्यांच्या कारवाया पूर्ण थांबतील, अशी निश्चिती देता येत नसल्याने सतर्कता बाळगणे आणि सुरक्षा पुरवणे महत्त्वाचे आहे.
‘हिंदूंचे संत सध्या समाजाला राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण होत आहे. त्याचा लाभ भाजपसारख्या पक्षांना मिळत असल्याने धर्मांधांकडून संतांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. संत म्हटले की, ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।’, अशी प्रतिमा लोकांच्या मनात असायची. पूर्वीच्या काळात तशाच प्रकारचे मार्गदर्शन लोकांकडून स्वीकारले जात होते; कारण काही दशके या देशावर गांधी यांच्या अहिंसक वृत्तीचा पगडा बसलेला होता आणि आजही काही प्रमाणात तो आहे. हा पगडा काँग्रेससाठी लाभदायक होता; मात्र जे ‘नाठाळांच्या माथां हाणू काठीं ।’, असे म्हणत होते, त्यांना मात्र काँग्रेसच्या राज्यात त्रास दिला जात होता. त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता. गोहत्या बंदीसाठी धर्मसम्राट स्वामी करपात्री महाराजांच्या नेतृत्वाखाली वर्ष १९६६ मध्ये देहलीतील संसदेवर काढण्यात आलेल्या साधू-संतांच्या मोच्र्यावर तत्कालीन काँग्रेस सरकारने गोळीबार करण्याचा आदेश दिल्यावर यात शेकडो साधू-संत ठार झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्या काळात संत सरकारच्या विरोधात किंवा हिंदूंना धर्माविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न करतांना दिसत नव्हते. रामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर विश्व हिंदु परिषदेशी संबंधित साधू-संतांनी धर्माविषयी जहाल भूमिका मांडण्यास चालू केल्यानंतर आज देवकीनंदन ठाकूर यांच्यासारखे आणि त्यानंतरच्या पिढीतील संत हिंदूंना अधिक प्रखर होण्यासाठी मार्गदर्शन करू लागले आहेत. साध्वी ऋतंभरा यांच्यानंतर अनेक साध्वी हे प्रयत्न करू लागल्या. साध्वी प्रज्ञासिंह यांना याच कारणाने खोट्या आरोपावरून काँग्रेस सरकारने कारागृहात टाकले. अन्यही संतांना ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’ म्हणून दाखवण्यासाठी अटक केली. ओडिशामध्ये वर्ष २००८ मध्ये ख्रिस्ती नक्षलवाद्यांनी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या केली होती. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती ओडिशातील धर्मांतरित झालेल्या आदिवासी आणि वनवासी लोकांना पुन्हा हिंदु धर्मात आणण्याचे कार्य करत होते. या रागातूनच त्यांना ख्रिस्ती मिशनरींच्या सांगण्यावरून ख्रिस्ती नक्षलवाद्यांनी अत्यंत अमानुषपणे ठार केले होते. केवळ जिहादीच नाही, तर ख्रिस्ती धर्मांधही हिंदूंच्या संतांचे हत्यारे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. अशा हत्यांच्या घटनांमुळे हिंदूंमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले अन् भाजपच्या हाती सत्ता दिली.
भाजप सरकारचे दायित्व !
देशात सध्या ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी आवई उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे हिंदूंच्या होणार्या हत्यांकडे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी दुर्लक्ष करतात. तरीही प्रसारमाध्यमांमध्ये हिंदूंच्या होणार्या अत्याचारांकडे पूर्वीच्या तुलनेत अधिक लक्ष दिले जात असल्याने हिंदूंना त्यांची माहिती होत आहे. तरीही ‘अशा घटना रोखण्यासाठी केंद्रातील आणि काही राज्यांत असलेल्या भाजप सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत’, असेच हिंदूंना वाटते. महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून उदयपूर (राजस्थान) येथे कन्हैयालाल यांचा शिरच्छेद करण्यात आला, तर भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही, अशा राज्यांत विशेषतः झारखंड, बंगाल आणि केरळ येथे हिंदु नेते, कार्यकर्ते यांच्या होणार्या हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याच जोडीला हिंदूंच्या संघटनांनी स्वसंरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. या स्थितीत हिंदूंच्या संतांचे दायित्व अधिक वाढले आहे. त्यांनी अधिक परिणामकारकपणे हिंदूंना जागृत करण्याचे कार्य करत त्यांना धर्मशिक्षण देण्यास प्रारंभ केला पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंच्या तरुणी लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदूंच्या संतांनी संघटित होऊन हिंदूंना धर्माविषयी मार्गदर्शन केले पाहिजे. हिंदूंच्या विविध धार्मिक संघटनांनी एका झेंड्याखाली संघटित झाले पाहिजे. हिंदूंचे अशा प्रकारचे धार्मिक संघटन झाले, तर आध्यात्मिक शक्ती अधिक निर्माण होईल आणि त्यातून जिहादी अन् मिशनरी यांना त्याचा वचक बसू शकेल. हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.