
गड-दुर्ग, मठ-मंदिरे, ऐतिहासिके स्मारके यांमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे. शिवछत्रपतींच्या प्रत्यक्ष पाऊलखुणा असलेल्या महाराष्ट्रातील हा समृद्ध वारसा जपण्याचे मोठे दायित्व राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे आणि या विभागानेही ते दायित्व श्रद्धापूर्वक पार पाडणे, ओघाने आलेच; परंतु सध्याच्या परिस्थितीत असे होतांना दिसत नाही. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा विकास करतांना घडलेल्या अयोग्य कृती पहाता ‘पुरातत्त्व विभाग श्रद्धाभंजक आहे’, असे कुणासही वाटेल; त्याला कारणेही तशीच आहेत ! पावसामुळे महालक्ष्मी मंदिराच्या छतामधून पाण्याची गळती होऊन गाभार्याजवळ पाण्याचा ‘तलाव’ झाल्याचे पहायला मिळाले. ही पाणीगळती ‘वॉटरप्रूफिंग’च्या कामापूर्वी झालेली असल्याचे सांगून पुरातत्त्व विभागाने हात वर केले असले, तरी पावसाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण का झाले नाही ? हा प्रश्न आहेच.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर संपूर्ण भारतीय सांस्कृतिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आणि स्थापत्य वारसा स्मारक आहे. मंदिराच्या विविध भागांमध्ये आढळणारे शिलालेख, शिल्पपट्टिका, वास्तू अवशेष आणि स्थापत्य वैशिष्ट्ये ही केवळ धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे, तर इतिहास, पुरातत्त्व, अभिलेखशास्त्र आणि कला-इतिहास यांच्या दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व असलेली आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘सकल हिंदु समाजाने पुरातत्त्व विभाग जे काही काम, ज्या काही पद्धतीने करणार आहे, त्याची माहिती भाविकांना उपलब्ध करावी’, अशी मागणीही केली होती. याची नोंद पुरातत्त्व विभागाने घेतली कि नाही, हे त्यालाच ठाऊक; पण त्यानंतर मंदिराच्या विकासकामांत जे आढळले, ते श्रद्धेला ठेच लागणारे आणि निषेधार्ह आहे.

संवेदनाशून्य पुरातत्त्व अधिकारी
मंदिराचे काम करतांना ‘सँड ब्लास्टिंग’ पद्धतीचा आणि अनुमती नसतांना ‘ब्रेकर’ यंत्राचा वापर केला जात असल्याने अनेक लहान-लहान मूर्तींचे कान-नाक, डोळे, तसेच अन्य अवयव तुटले आहेत, छोट्या मूर्ती पूर्णतः झिजल्या आहेत. या कामाच्या वेळी अनेक मूर्ती पोत्यात भरून ठेवलेल्या आढळल्या. मंदिर परिसरातील कारंजेही तोडण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात तर मंदिरावर कळस बसवला गेला, तोही कुठला धार्मिक विधी न करताच ! त्याही पुढे मंदिरात भाविकांना कधीतरी दर्शन मिळते, अशा मातृलिंग मंदिरात कामगार चक्क झोपा काढत असल्याचे आरोप आहेत. ३ वर्षांपासून काम चालू असूनही गरुड मंदिराला पूर्णत्व आलेले नाही. मंदिर परिसरातील छोट्या मंदिरांच्या दुरुस्तीची कामे करतांना देवतांचे ‘प्राण’ (तत्त्व) काढण्याचे प्रकार (एक विधी) पुनःपुन्हा होत आहेत. मंदिर विकासाच्या कामांच्या संदर्भात झालेल्या बैठकीत पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे आणि काम करणारे खासगी आस्थापनाचे अधिकारी यांनी दिलेली उडवाउडवीची उत्तरे कामांमध्ये होत असलेल्या हलगर्जीपणाला वाव देतात. कर्मचार्यांकडून होणार्या कृती आणि त्या होऊ देणारे पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्याकडून श्रद्धेची अपेक्षा तर दूरच; संवेदनशीलतेचीही अपेक्षा करता येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरासंदर्भात जे होत आहे, तीच गत पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर आणि तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिर यांच्या संदर्भातही आहे. ज्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणांवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांच्यासह अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली धर्मशास्त्रातील जाणकार आणि धर्माचार्य यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुनःपुन्हा रासायनिक लेपनाचा अट्टहास केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांच्या संदर्भातही तेच ! ज्या छत्रपती शिवरायांमुळे महाराष्ट्र आणि येथील जनता यांचे आता अस्तित्व आहे, त्यांचेच गड-दुर्ग औरंगजेबाच्या वंशजांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. याचे महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना देणे-घेणे आहे का ?
मंदिर विकासासाठी श्रद्धा हवीच !
संत नामदेवांच्या भक्तीमुळे मूर्तीतील विठ्ठलाला प्रत्यक्ष येऊन नैवेद्य खावा लागला, छत्रपती शिवरायांना साक्षात् श्री भवानीमातेने तलवार दिली, ही महाराष्ट्रातील जनतेची श्रद्धा आहे. याच श्रद्धेवर आजपर्यंत महाराष्ट्र जगला आहे. त्यामुळे ‘देवतांच्या मूर्ती म्हणजे काही दगड नव्हे, ज्याचे केवळ सुशोभिकरण करायचे आहे’, हे पुरातत्त्व विभागाने लक्षात घ्यावे. विभागाला संवर्धन आणि संरक्षण यांच्या कामासाठी भरघोस मिळालेला निधीही याच श्रद्धावान जनतेचा आहे. याची जाण पुरातत्त्व विभागाने ठेवावी.
मंदिर, त्यातील देवता आणि श्रद्धा हा एकच विषय आहे. त्यांना वेगळे करता येऊ शकत नाही. त्यामुळेच ‘पुरातत्त्व विभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी अशा स्थानांचे संवर्धन करतांना काय विचार करतात ?’, याचा विचार अन् अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. ‘हा विषय प्रशासकीय कामाचा नाही, तर श्रद्धेचा आहे’, हे पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ‘सँड ब्लास्टिंग’ पद्धत, ‘ब्रेकर’ यंत्र अशा आधुनिक तंत्र पद्धतींचा वापर करतांना झालेले भंजनाचे प्रकार भाविकांच्या श्रद्धेवर थेट घाव घालणारे आहेत’, याची जाणीव पुरातत्त्व विभागाला आहे का ? आणि नसेल, तर ती जाणीव त्यांनी निर्माण करावी. पुरातत्त्व विभागाने केवळ ‘वस्तू अथवा वास्तू’ म्हणून संवर्धन अथवा संरक्षण करू नये. श्रद्धा आणि भाव यांची माहिती नसल्यास जाणकारांकडून ती समजून घ्यावी अन् त्यांनी सांगितल्यानुसार धर्मशास्त्रीय पद्धतीने कामे करावीत.
पुरातत्त्व विभाग महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन करतांना ‘तत्त्व’ म्हणजेच संवेदनशीलता, निष्ठा आणि आदर विसरल्याचे विदारक चित्र आहे. देवतांच्या प्राचीन मूर्ती आणि गड-कोट हे केवळ सुशोभीकरणाचे निर्जीव प्रकल्प नसून ते महाराष्ट्राच्या जिवंत अस्मितेचे आणि कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे पवित्र केंद्र आहेत. विकासाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली होणारा हलगर्जीपणा, देवतांचे विद्रूपीकरण, अवमान तात्काळ थांबायला हवा. शासनाने हे लक्षात ठेवावे की, वारशाचे रक्षण केवळ निधी खर्च करून होत नाही, तर त्याला श्रद्धेची जोड असावी लागते. पुरातत्त्व विभागाने त्याच्या कारभाराचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करावे. पुरातत्त्व विभागाने धर्मशास्त्राच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कृतीतून ते हरवलेले ‘तत्त्व’ पुन्हा एकदा निर्माण न केल्यास भाविक स्वतःच त्यासाठी योग्य ती कृती करतील.
संपादकीय – अमेरिकेची कूटनीती !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
संपादकीय : मनसुबे उघड !
संपादकीय : ‘विद्यार्थीहिताय ।’