मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत

काँग्रेस पक्षाचा तीव्र आक्षेप

पणजी, २४ जुलै (वार्ता.) – मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वापरण्यात आलेल्या अनुमाने २ कोटी रुपयांच्या वीजदेयकाच्या रकमेत सरकारने सवलत दिल्याच्या निर्णयावर गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी तीव्र आक्षेप घेत सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा आणि संबंधित आयोजकांकडून संपूर्ण रक्कम वसूल करावी अन् या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. राज्यातील करदात्यांच्या पैशातून खासगी कार्यक्रमाला लाभ दिल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक वाढत्या वीजदरांचा आणि महागाईचा सामना करत असतांना एका खासगी कार्यक्रमासाठी वीजदेयकात कोट्यवधी रुपयांची सवलत देणे, हे जनहिताच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात कवठणकर यांनी पुढे म्हटले आहे की, या निर्णयाच्या संदर्भातील सर्व धारिकांवरील नोंदी, संमती, पत्रव्यवहार आणि निर्णय प्रक्रिया यांमधील कागदपत्रे सार्वजनिक करावीत आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून उत्तरदायित्व निश्‍चित करावे.