संपादकीय : घटनात्मक सन्मान !

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशाच्या राज्यसभेत २४ जुलै या दिवशी एक महत्त्वाचे सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला; परंतु देशाच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्रोत ठरलेल्या आणि क्रांतीसाठी स्फूर्ती देणार्‍या ‘वन्दे मातरम्’ या गीताला केवळ मुसलमानांच्या विरोधामुळे काँग्रेसने ‘राष्ट्रगीता’चा दर्जा दिला नाही. २४ जानेवारी १९५० या दिवशी संविधान सभेत ‘वन्दे मातरम्’ला दर्जा राष्ट्रीय गीताचा देण्यात आला; परंतु प्रत्यक्षात कायदेशीरदृष्ट्या त्याविषयी कोणतीच कार्यवाही अद्यापपर्यंत झालीच नाही. ती कार्यवाही करणारे ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६’ राज्यसभेत सादर करण्यात आले. ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही आणि अद्याप लोकसभेत हे विधेयक सादर करावयाचे आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाच्या संमतीनंतर प्रत्यक्षात भारताच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर ‘वन्दे मातरम्’ला कायदेशीरदृष्ट्या राष्ट्रगीतासम दर्जा प्राप्त होईल, हे या विधेयकाचे महत्त्व आहे.

हा राष्ट्रद्रोहच होता !

वर्ष १९७१ मध्ये राष्ट्रीय चिन्हे, राष्ट्रध्वज, राज्यघटना आणि राष्ट्रगीत यांचा अवमान रोखण्यासाठी ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा’ करण्यात आला. या कायद्याच्या अंतर्गत राष्ट्रध्वज, राज्यघटना, राष्ट्रगीत यांचा अवमान केल्यास शिक्षेचे  प्रावधान करण्यात आले. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत असल्यामुळे ते गाण्यामध्ये अडथळा आणणे, तसेच ते म्हणण्यापासून मज्जाव करणे, हे या कायद्यांतर्गत गुन्हा समजले जाते. काँग्रेसने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीतासह दर्जा दिला असला, तरी कायद्यामध्ये मात्र ‘वन्दे मातरम्’ गीताचा अवमान झाल्यास गुन्हा ठरेल’, असे प्रावधान केलेच नाही. या सुधारित विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर ‘वन्दे मातरम्’चा अवमान करणार्‍यांवर कायद्याद्वारे कठोर शिक्षा होऊ शकेल. जे यापूर्वीच व्हायला हवे होते; परंतु काँग्रेसच्या मुसलमानधार्जिण्या धोरणामुळे हे होऊ शकले नाही. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसने केलेला हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच आहे. याची खरेतर काँग्रेसला लाज वाटायला हवी.

लांगूलचालनासाठी राष्ट्रहिताला तिलांजली

ज्या गीताने कोट्यवधी भारतियांना स्वातंत्र्यप्राप्तीची प्रेरणा दिली. अनेक क्रांतीकारक ‘वन्दे मातरम्’ म्हणत देशासाठी फासावर गेले. याच गीताचा घोष करत अनेकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, असे हे स्फूर्तीगीत स्वतंत्र भारताचे ‘राष्ट्रगीत’ व्हावे, ही जनभावना होती; परंतु मुस्लिम लीग आणि काही मुसलमान नेते यांच्या विरोधामुळे राष्ट्रप्रेमींच्या भावनेला काँग्रेसने तिलांजली दिली. स्वत:ची अगतिकता आणि हतबलता झाकण्यासाठीच काँग्रेसने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा देण्याची औपचारिकता केली; परंतु घटनात्मकदृष्ट्या मात्र या गीताला कधीच सन्मान दिला नाही. खरेतर ‘वन्दे मातरम्’ म्हणत गांधींसमवेत सत्याग्रहात उतरणारे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच अधिक होते. असे असतांनाही जेव्हा मुसलमानांच्या धार्मिक भावनांचा विषय येतो, तेव्हा तो राष्ट्रहिताचा का असेना, काँग्रेसला तो पचनी पडत नाही. काँग्रेसच्या या लांगूलचालनाचे फटके पुढे राष्ट्रहिताला वारंवार बसले; परंतु त्यापूर्वी त्याचा फटका ‘वन्दे मातरम्’ला बसला. आताच्या या सुधारणा विधेयकाद्वारे ‘वन्दे मातरम्’वरील एक मळभ दूर होईल, असे म्हणता येईल.

राष्ट्रीयत्वाला दूर लोटले !

‘वन्दे मारतम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा न देण्याच्या निर्णयाला या गीताचा अवमान म्हणून कुणीच पाहू नये, असे काम काँग्रेसने केले. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या राष्ट्रभावनेला काँग्रेसने दिलेला हा दुजाभाव आहे. जेव्हा हे गीत गायले जाते, तेव्हा त्याचा इतिहासही समाजापुढे रहातो आणि या गीताचा इतिहास देशाला स्वातंत्र्यप्राप्त करून देणार्‍या एका धगधगत्या ‘चिंगारी’चा आहे. ही राष्ट्रभक्तीची चिंगारी तेवत ठेवण्याचे कार्य या गीतातून भावी पिढीपर्यंत पोचते. ही कुणाला अतिशयोक्ती वाटेल; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीचा इतिहास ज्यांना ठाऊक आहे, त्यांनाच ‘वन्दे मातरम्’ म्हणजे काय होते, हे कळेल. ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रगीताचा दर्जा न देणे किंवा त्यानंतर ‘वन्दे मातरम्’चा अवमान करणार्‍यांना कायद्याद्वारे कठोर कायद्याचे प्रावधान न करणे यात काय मोठे आहे ? असेही कुणाला वाटेल; परंतु काँग्रेसने राष्ट्रचेतना विझवण्याचे असे अनेक प्रयोग केले. त्याचा परिणाम भारताची सध्याची पिढी भोगत आहे. याचे मोठे उदाहरण, म्हणजे भारताला शूरवीर, धर्मनिष्ठ, राष्ट्रभक्त अशा अनेक थोर पुरुषांचा इतिहास असतांनाही तो विद्यार्थ्यांना शिकवलाच गेला नाही. ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन्.सी.ई.आर्.टी.)’च्या पाठ्यपुस्तकात तर हुमायू, बाबर, अकबर आदी भारतावर आक्रमण करणार्‍या मोगलांचा इतिहास शिकवला गेला. याउलट छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी थोर राष्ट्र पुरुषांचा इतिहासाची केवळ औपचारिकता दाखवली गेली. हाच काँग्रेसचा राष्ट्रद्रोह होय. या राष्ट्रपुरुषांच्या इतिहासापासून युवा पिढीला वंचित ठेवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण होण्यास प्रतिबंध घालण्याचे काम काँग्रेसने केले. जे ‘वन्दे मातरम्’विषयी केले, तसेच राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाविषयी काँग्रेसने केले.

कलंक पुसावे लागतील !

पाठ्यपुस्तकातून आक्रमकांचा इतिहास वगळून राष्ट्रपुरुषांचा इतिहास शिकवणे, म्हणजेच गुलामगिरीचे जोखड बाजूला सारून युवा पिढीला राष्ट्राभिमानी बनवणे होय आणि हे काम केंद्रातील भाजप सरकारने हाती घेतले आहे, हे चांगले आहे. ‘वन्दे मातरम्’ गीतालाही कायद्याद्वारे राष्ट्रगीतासम दर्जा देण्याचा निर्णय, हा त्याचाच एक भाग आहे. काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीमध्ये राष्ट्रहिताला बाधक ठरणारे आणि सत्तेसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या काळात या सर्वांविषयी गांभीर्याने विचार करणे आणि राष्ट्रहिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. भारतात बहुसंख्य असूनही हिंदूंना देण्यात येत असलेले दुय्यम स्थान असो, सच्चर आयोगानंतर मुसलमानांसाठी तत्कालीन पंतप्रधान

डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात असलेल्या विविध योजना असोत, शासकीय आणि अनुदानित शाळेत हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास घातलेली बंदी असो, असे अनेक निर्णय राष्ट्रासाठी बाधक आहेत. काँग्रेसने असे निर्णय केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी घेतले आणि ते अद्यापही चालू आहेत. याविषयीही केंद्रशासनाने लवकरात लवकर राष्ट्रहित साधणारे निर्णय घ्यावेत !

राष्ट्रहित बाजूला सारून मुसलमान हिताला प्राधान्य देणारे सर्वच निर्णय सरकारने रहित करावेत !