‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वाणीतून प्रगटलेली विठ्ठलभक्ती

संत तुकाराम महाराज

१. पुंडलिक आणि विठ्ठल यांची झालेली भेट

‘भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूरला श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. भक्त पुंडलिकाच्या भेटीला श्री विठ्ठल आला होता; परंतु आपल्या मातापित्याच्या सेवेत पुंडलिक इतका तल्लीन झाला होता की, साक्षात् ‘श्री विठ्ठल आपल्या भेटीस आला आहे’, याची त्याला जाणीवही झाली नाही. देव भेटीला आला असला, तरी पांडुरंगाने मातापित्याच्या सेवेत खंड पडू नये; म्हणून श्री विठ्ठलाकडे जवळ असलेली वीट भिरकावली आणि त्याला त्यावर उभे रहाण्यास सांगितले. पुंडलिकाच्या भेटीची वाट पहात श्री विठ्ठल विटेवर उभा राहिला. तो आजतागायत तिथेच उभा आहे, अशी आख्यायिका आहे.

श्री विठ्ठल आणि भक्त पुंडलिक

२. वारकर्‍यांना वर्षभर वारीची आस लागणे

विठ्ठलभेटीची आस संतजनांनाच नाही, तर ईश्वरभक्तीत लीन झालेल्या भक्तजनांनाही आहे. प्रतिवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनेक वारकरी चालत पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. या भेटीची त्यांना वर्षभर आस लागलेली असते. याचे वर्णन संत तुकाराम महाराजांनी ‘भेटीलागी जीवा…लागलीसे आस ।’, या अभंगात केले आहे. त्याला तोड नाही.

२ अ. चकोर पक्षाला चंद्राचा ध्यास, तर संत तुकाराम महाराज यांना विठ्ठलाचा ध्यास !

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ।।

‘चंद्र आणि चकोर पक्षी यांचे एकमेकांप्रती असलेले आकर्षण हे प्रेम अन् निष्ठा यांचे द्योतक आहे. चंद्र हेच चकोराचे जीवन असून त्याचा ध्यास चकोराला असतो. तसाच ध्यास, हे विठ्ठला ! मला तुझा लागला आहे’, असे तुकाराम महाराज म्हणतात.

२ आ. लेकीला माहेरपणाची आस लागते, त्याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांना विठ्ठलभेटीची आस : लेकीला संसार सांभाळतांनाच माहेरी परतण्याची ओढ असते. दिवाळीनिमित्त तिला माहेरी येण्याची संधी मिळते. तिला ‘दिवाळीचा सण कधी येतो’, असे वाटत असते. संत तुकाराम म्हणतात, ‘प्रपंचात राहून दायित्व निभावतांना मलाही श्री विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे.’

दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।

पाहतसे वाटुली पंढरीची ।।

२ इ. आईसाठी आक्रोश करणार्‍या भुकेलेल्या बाळाप्रमाणे संत तुकाराम महाराज विठ्ठलदर्शनासाठी आसुसलेले असणे : बाळाला जेव्हा भूक लागते, तेव्हा ते आक्रोश करते; कारण त्याला त्याची आई हवी असते, जी येऊन त्याची भूक शांत करू शकेल. त्यासाठी बाळ आतुरतेने आईची वाट पाहत असते. बाळाचा आक्रोश केवळ त्याच्या आईसाठीच असतो.

भुकेलेला बाळ अती शोक करी ।

वाट पाहे परी माऊलीची ।।

संत तुकाराम विठ्ठलाला म्हणतात, ‘हे माऊली ! भुकेलेले बाळ आईसाठी शोक करत आहे, तसेच मी तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ आहे आणि तुझ्या भेटीसाठी आतुरलेलो आहे. बाळाला जशी आईच्या प्रेमाची भूक लागते आणि ते आईसाठी व्याकुळलेले असते, तशीच भूक मला तुझ्या दर्शनाची लागली आहे. हे विठ्ठला, तुझ्या भेटीसाठी, तुझ्या एका दर्शनासाठी माझा जीव तळमळत आहे. हे विठ्ठला ! तुझे दर्शन मला कधी होईल ? आता तुझे हे सुंदर रूप आम्हाला दाखव.’

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धावुनी श्रीमुख दावी देवा ।।

– कविता आमोणकर, गोवा

(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २१.६.२०२५)