अब्दुल सत्तार यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

अब्दुल सत्तार

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – नियमांना डावलून गायरानाची भूमी दिल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, ही मागणी विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात लावून धरली. त्यामुळे २६ डिसेंबर या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित  करण्यात आले.

सभागृह स्थगित झाल्यामुळे दुपारनंतरच्या सत्रातील लक्षवेधी सूचनांवर चर्चा होऊ शकली नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप झालेल्या मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून त्याविषयीचे निवेदन करावे, यासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिले आहे. त्यामुळे कृषीमंत्री सत्तार यांना २७ डिसेंबर या दिवशी सभागृहात उपस्थित राहून त्यांच्यावरील आरोपांविषयी निवेदन करावे लागणार आहे. यावरून २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सत्तार यांच्या त्यागपत्रावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.