राष्ट्रीय अभिलेखागाराकडे वर्ष १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाविषयीची नोंदच नाही !

नवी देहली – राष्ट्रीय अभिलेखागाराकडे (नॅशनल अर्काव्हज ऑफ इंडियाकडे) वर्ष १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धाविषयीची आणि हरित क्रांतीविषयीची कोणतीच नोंद नाही. अनेक केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित विभाग वांनी या ऐतिहासिक घटनांशी नोंदी केलेल्याच नाही, अशी माहिती या अभिलेखागाराचे महासंचालक चंदन सिन्हा यांनी दिली.

सिन्हा यांनी पुढे सांगितले की, केवळ भारत सरकार त्याच्या संस्थांच्या नोंदी ठेवते आणि जतन करते. त्याला वर्गीकृत कागदपत्रे मिळत नाहीत. अभिलेख व्यवस्थापन ही शासनाची अत्यावश्यक गोष्ट आहे. अशी अनेक मंत्रालये आहेत ज्यांनी स्वातंत्र्यानंतर त्यांच्या नोंदी आम्हाला दिलेल्या नाहीत. मला पुष्कळ दुःख होत आहे, आमच्याकडे या महत्त्वाच्या घटनांशी संबंधित कोणतीही नोंद नाही. खरे तर स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाचा एक मोठा भाग आपण गमावत आहोत का ? हा प्रश्‍न आपल्याला भेडसावत आहे.

काय आहे राष्ट्रीय अभिलेखागार ?

ऐतिहासिक घटनांची नोंद ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेली असते, त्या ठिकाणाला ‘अभिलेखागार’ असे म्हणतात. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, जागतिक करारांची कागदपत्रे इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.

संपादकीय भूमिका

भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवली न जाणे लज्जास्पद ! यास उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक !