आयटीआय विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन लागू करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

विधान परिषदेतून…

आयटीआयच्या नूतनीकरणासाठी १ सहस्र २०० कोटींची तरतूद !

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार आहे. येत्या ३ मासांत विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याविषयी तारांकित प्रश्नात सदस्य विक्रम काळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय आदींनी सहभाग घेतला.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेशशुल्क अल्प आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न चालू आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करून १०० टक्के प्रवेश होण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करत आहे. जिल्हा आणि तालुका येथे मागणीनुसार औद्योगिक अन् उद्योगपूरक अभ्यासक्रम चालू करण्याची कार्यवाही चालू आहे. स्थानिक कुशल कामगार आणि आयटीआयमधील शिक्षक यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यात ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून यासाठी १ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी वर्ग (व्हर्च्युअल क्लासरूम), ग्रंथालय आणि जिम अशा विविध सुविधा देण्यात येईल. येत्या ६ मासांत याविषयी कार्यवाही होईल.