पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथील ‘शिवस्मारका’चे काम अद्याप सरकारद्वारे करण्यात आलेले नाही. या स्मारकासाठी वर्ष २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जलपूजन’ करण्यात आले होते; परंतु पुढील कार्य अद्याप चालू झालेले नाही. स्मारकाकरता आवश्यक त्या सर्व अनुमती असतांनाही स्मारक उभारणीस विलंब होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी याची नोंद न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येतील, अशी चेतावणी ‘शिवस्मारक युवा संघर्ष समिती’च्या वतीने अध्यक्ष सूरज दिघे, मुख्य प्रदेश प्रवक्ते शुभम चव्हाण, महिला अध्यक्षा धनश्री म्हस्के आदींच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत देण्यात आली. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन काम पूर्ण का करत नाही ? – संपादक)
या वेळी दिघे म्हणाले की, शिवस्मारका’च्या उभारणीकरता गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. येत्या १ जानेवारी २०२३ या दिवशी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपति येथे आरतीचे आयोजन केले आहे. या दिवशी पुढील भूमिका स्पष्ट करू.
धनश्री म्हस्के म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणार्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी त्यांचा इतिहास आणि गड-दुर्गांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे; मात्र राज्यातील गड-दुर्गांची दुरवस्था होत आहे. चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करण्यात येत आहे. याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.