डायवर्जन्स सर्टिफिकेट !
(सरकारी कागपदपत्रांमधील नावांमध्ये पालट करण्यासाठी दिले जाणारे सरकारी प्रमाणपत्र)
१. प्रमाणपत्रांमधील अयोग्य शब्दलेखनामुळे होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी नावांचे शब्दलेखन अचूक असणे आवश्यक !
‘गोव्यामध्ये अलीकडे एकाच देवनागरीत असलेल्या गावांच्या नावाचा बराच बोलबाला झाला. ‘डिचोली’ ऐवजी ‘बिचोली’, ‘दिवचल्’ उच्चारतांना तर गोंधळ होतोच; परंतु पत्ते लिहितांनाही पुष्कळ पंचाईत होते. पोर्तुगिजांनी याविषयी बरेच घोळ घालून ठेवलेले आहेत. बहुदा पुष्कळसे पोर्तुगीज अनुनासिक होते; त्यामुळे ‘म’ या शब्दानेच त्यांचा कोणताही उच्चार पूर्ण व्हायचा. पणजीला ‘पन्जीम्’ आणि डिचोलीला ‘डिचोलिम्’ असा उच्चार केला जायचा. गोव्यातील बहुसंख्य गावांची नावे अशी आहेत की, ज्यांचा उच्चारच करता येत नाही किंवा केला, तर शेवटी ‘म’ हा उच्चार येतो. गावांच्या नावांसारखी परिस्थिती माणसांच्या नावाचीही आहे. सरकार दरबारी विशेषतः पोर्तुगिजांच्या काळात कित्येक माणसांच्या नावांचे शब्दलेखन (स्पेलिंग) चुकीचे आहे, नावांमध्ये काहीतरी पालट केलेला आहे, काही नावे गाळलेली आहेत किंवा एकाच व्यक्तीची नावे विविध प्रमाणपत्रांवर विविध पद्धतीने लिहिलेली आहेत. कित्येक महिलांची नावे लग्नाच्या पूर्वीची होती. पुढे त्यात पालट न केल्याने विवाह प्रमाणपत्रांवर वेगळीच नावे आहेत.
२. गोव्यामध्ये महत्त्वाची समजली जाणारी ३ कागदपत्रे
गोव्यामध्ये ३ कागदपत्रे पुष्कळ महत्त्वाची समजली जातात.
अ. जन्माचा दाखला
आ. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
इ. आधारकार्ड
ही कागदपत्रे उत्तराधिकार प्रमाणपत्र (सक्सेशन डिड), वारसा प्रमाणपत्र, ‘म्युटेशन-पार्टिशन’, रहिवासी दाखला, वाहन चालवण्याचा परवाना अशा कित्येक महत्त्वाच्या कामांसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे निर्दोष असून त्यातील लिखाण आणि तपशील अगदी व्यवस्थित असणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने हे बघणे, पडताळणे आणि गडबड वाटल्यास त्यात योग्य तो पालट करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या घरात एखादी व्यक्ती मृत होते आणि त्यानंतर वारसा हक्कासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते, तेव्हा मात्र खरी डोकेदुखी चालू होते. ‘सेल्फ अटेस्टेड डिक्लेरेशन’, प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) अशा इतर महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता भासते. त्यातील एक मुख्य कागदपत्र म्हणजे ‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’.
‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’ म्हणजे काय ?‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’, म्हणजे तुमचे सरकारी कागपदपत्रांमधील नावामध्ये पालट करावयाचा असेल, तर त्यासाठी सरकारी प्रमाणपत्र दिले जाते. त्यात तुम्हाला अपेक्षित असलेल्या नावात सुधारणा करून मिळते. ‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’ हे महसूल विभागाच्या अंतर्गत येते. हे प्रमाणपत्र मामलेदार कार्यालयात मिळते. त्यासाठी जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, स्वतःचे ॲफिडेविट ही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. गोव्यामध्ये ‘ऑनलाईन’ पद्धतीने आवेदन भरता येते. |
www.goaonline.gov.in या संकेतस्थळावर गेलात, तर तुम्हाला ‘सर्व्हिसेस डिटेल’ नावाखाली ‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’ असा पर्याय येतो. त्याला ‘सिलेक्ट’ केले की, अर्ज उपलब्ध होतो. साधारणपणे ५ दिवसांमध्ये विनंती प्रक्रिया होते. मामलेदार हा या विभागाचा मुख्य असतो आणि त्याच्यावर अपिलीय अधिकारी असतो, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असतो. थोडा मोकळा वेळ असल्यास नागरिकांनी त्यांच्या कागदपत्रांतील कमतरता दूर करण्याची मोहीम हाती घ्यायला हरकत नाही; कारण या सर्व प्रमाणपत्रांचा नंतर उपयोग होतो. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (इन्कम सर्टिफिकेट), रहिवासी प्रमाणपत्र, सर्व्हे प्लान आदी महत्त्वाची कागदपत्रे या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळवता येतात; परंतु विविध नावांमध्ये सुधारणा करून एकच व्यवस्थित नाव असलेले कागदपत्र ‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’च्या माध्यमातून पालटून घेता येते.’
– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.