वेदांनुसार आचरण केल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे !

श्री श्री प.पू. १००८ यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांचे विधान 

श्री श्री प.पू. १००८ यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज

भोसरी (पुणे) – गोमाता आणि ब्राह्मण यांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूचे जे विविध अवतार झाले, त्या अवतारांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारात त्याने स्वत: गोपालन करून समाजासमोर आदर्श समोर ठेवला आहे. प्राचीन काळी राजा दिलीप याने चांगल्या प्रकारे गोसंगोपन केल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. वेदांच्या अभ्यासामुळे मनुष्य पापाचार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार यांपासून लांब राहून त्याचे रक्षण होते. जो सत्यवादी असतो, तो कधीही लोभ करत नाही. त्यामुळे वेदांनुसार आचरण केल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे, असे मत श्री श्री प.पू. १००८ यती अनिरुद्धानंदतीर्थजी महाराज यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत  आयोजित ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदेस’ ते उपस्थित आहेत. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन राष्ट्र-धर्म विषयक मार्गदर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

१. गोमाता, ब्राह्मण, वेद, सतीस्त्री, सत्य बोलणे, लोभ नसणारा आणि दानी व्यक्ती अशा सात खांबांवर पृथ्वी तोलली गेली आहे. सध्या याची घडी विस्कटल्याने सगळीकडे अधर्म वाढला आहे.

२. वेदांना अपेक्षित असे लक्षणयुक्त गोपालन होणे महत्त्वाचे आहे. अशा गायी पूर्वी आपल्याकडे होत्या. त्यामुळे आपण समृद्ध होतो. अशा लक्षणयुक्त गायींचे दूध पिऊन भारतीय वेद धारण करत होते आणि त्याचप्रकारची संततीही पुढे होत होती. हे पाश्चात्त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी वर्णसंकर करून जर्सी गायींची उत्पत्ती भारतासाठी केली. अशा गायींचे दूध सध्या भारतीय प्राशन करत असल्याने ते बलहीन आहेत.

३. ‘एक नारी ब्रह्मचारी’ म्हणजेच मनुष्याने एकपत्नीनिष्ठच रहाणे आवश्यक आहे. असे करणे म्हणजेच धर्मपालन आहे. यामुळेच देशाचे कल्याण होईल.

४. पूर्वीच्या काळी जी वर्णाश्रमव्यवस्था होती, त्यामुळे जगाचे कल्याण होत होते. वर्णाश्रम व्यवस्थेचा आपण त्याग केल्यानेच सध्याची दुरवस्था निर्माण झाली आहे. जे वेदप्रामाण्य आहे, जे वेदांनी सांगितले आहे, त्याचा आपण अंगिकार केला पाहिजे.

संपादकीय भूमिका

पूर्वीच्या काळी असणार्‍या वर्णाश्रम व्यवस्थेचा आपण त्याग केल्यानेच सध्याची दुरवस्था निर्माण झाली आहे !