देशात पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्र सरकार

चीनमध्ये कोरोनाच्या झालेल्या उद्रेकाचा परिणाम !

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नवी देहली – चीनमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. येथे पुढील ३ मासांमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जगात सतर्कतेची चेतावणी देण्यात येत आहे. भारतातही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘देशात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे’, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या २ वर्षांत देशात अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशातील कामकाज ठप्प झाले होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने २२० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास चालू केले आहे. परदेशातून येणार्‍या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही, याकडे सरकारचे लक्ष असेल.

कोरोनाच्या ‘ओमीक्रॉन बीएफ्.७’ विषाणूचा वाढता प्रभाव

आरोग्य तज्ञांनी सांगितले की कोरोनाचा ‘ओमीक्रॉन बीएफ्.७’ या विषाणूमुळे चीनमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील ३ मासांमध्ये कोरोनाच्या ३ लाटा येण्याचा धोका आहे. यामुळे तेथील ८० कोटी लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

भारतात गेल्या आठवड्यात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू

गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे १ सहस्र १०३ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

घाबरून न जाता मार्गदर्शक सूचनांचे पालन करा ! – अदर पूनावाला !

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी याविषयी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, चीनमधील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत; परंतु आपली उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि मागील अनुभव पहाता घाबरण्याची आवश्यकता नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालय यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्‍वास ठेवून त्यांचे पालन केले पाहिजे.