ताजमहालला २ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्याची महापालिकेकडून नोटीस !

ताजमहाल

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील महापालिकेने पुरातत्व विभागाला ताजमहालची पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावली आहे. पाणीपट्टीसाठी २ कोटी रुपये, तर मालमत्ता करासाठी दीड लाख रुपये भरण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. दुसरीकडे आगरा गडासाठी ५ कोटी रुपये सेवा कर भरण्यास स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या नोटिसा २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता आहेत. पुरातत्व विभागाला ही रक्कम भरण्याकरता १५ दिवसांची मुदतही देण्यात आली आहे.

१. ऐतिहासिक वास्तू, राष्ट्रीय स्मारक आदींना अशा प्रकारच्या करांतून सवलत देण्यात येते, असे आगरा येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले; परंतु ‘अनेक इमारतींना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातून सवलत मिळण्याकरता जे पात्र आहेत त्यांना तो दिला जाईल’, असे महापालिका आयुक्त निखिल फुंडे यांनी सांगितले.

२. पुरातत्व विभागाच्या आगरा सर्कलचे अधीक्षक आणि पुरातत्व तज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले की, पुरातत्व विभाग देशभरातील सुमारे ४ सहस्र राष्ट्रीय स्मारकांची देखभाल करते. यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही करांचा भरणा विभागाने केलेला नाही. ताजमहाल हे राष्ट्रीय स्मारक असून त्याला हे कर लागू होत नाहीत. आतापर्यंतच्या नोंदीनुसार अशा प्रकारच्या नोटिसा पहिल्यांदाच आल्या आहेत.