सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम
‘जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांपासून बनवलेले द्रव स्वरूपातील नैसर्गिक खत) सिद्ध झाल्यापासून सात दिवसांत संपवावे लागते; परंतु घनजीवामृत वर्षभर साठवता येते. घनजीवामृत हे जिवामृताप्रमाणेच मातीतील जीवाणूंची संख्या वाढवण्याचे कार्य करते.
१. रोप लावण्यासाठी कुंडी भरतांना घेण्याचे प्रमाण
पालापाचोळा आणि माती यांच्या मिश्रणात एका मध्यम आकाराच्या कुंडीसाठी १ मूठ घनजीवामृत घालावे. यावर पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडून कुंडी सुती कापडाने ४८ घंटे झाकून ठेवावी आणि नंतर रोप लावावे.
२. विटांचा वाफा (लागवडीसाठी बनवलेला कप्पा) भरतांना घेण्याचे प्रमाण
वाफ्याच्या आकारमानाप्रमाणे पालापाचोळा आणि माती यांचे मिश्रण ४ भाग, तर १ भाग घनजीवामृत घ्यावे. घनजीवामृत मातीच्या मिश्रणात नीट मिसळावे. यावर पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडून वाफा सुती कापडाने किंवा गोणीने ४८ घंटे झाकून ठेवावा आणि नंतर लागवडीला आरंभ करावा.
वरील प्रमाण हे साधारण अनुमान यावे, यासाठी दिले आहे. घनजीवामृत मिसळतांना प्रमाण अल्प-अधिक झाल्यास काही अपाय होत नाही. घनजीवामृत बनवणे, हे शेणाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. त्यामुळे शेण अल्प प्रमाणात उपलब्ध असेल, तर केवळ जीवामृत नियमितपणे दिले तरीही चालते.
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा.(९.१२.२०२२)