परिपूर्णतेचे मूर्तीमंत स्वरूप असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात सेवा करतांना श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले म्हणजे परिपूर्णता आणि प्रीती यांचे मूर्तीमंत स्वरूपच ! सर्वज्ञ असलेले परात्पर गुरु डॉक्टरांनी स्पर्श केला नाही, असा कोणताही विषय नाही. अवतारत्वाला मानवी देहाच्या मर्यादांचे बंधन असूनही जवळजवळ सर्वच क्षेत्रांत, म्हणजे बांधकामापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सर्वज्ञतेचा ठसा उमटवला आहे. साधकांना अपूर्णतेची जाण करून देऊन आणि त्यांना पूर्णत्वाचा ध्यास लावून प्रत्येक कृती परिपूर्ण करायला प्रोत्साहित करणारे अन् वेळप्रसंगी स्वतःच्या कृतीतून शिकवणारे परात्पर गुरुदेव यांच्याप्रती किती कृतज्ञतापुष्पे अर्पण करावीत ! स्वतः सतत शिकण्याच्या भूमिकेत राहून साधकांना साधनेचे बारकावे शिकवून परिपूर्णतेकडे नेणार्‍या परात्पर गुरुदेवांच्या संदर्भात ‘कृतज्ञता’ हा शब्दही थिटाच पडेल. साधकांचे ईश्वरप्राप्तीचे व्यष्टी ध्येय आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे समष्टी ध्येय ही किती परस्परपूरक ध्येये आहेत, हेही इथे लक्षात येते. २० डिसेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात वर्ष २००५ मध्ये रामनाथी आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

भाग ३. 

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/637721.html

३. अन्य सूत्रे

३ इ. साधकाला बोलण्यातील दोष घालवण्याचे महत्त्व सांगून त्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे

श्री. राहुल कुलकर्णी

एकदा प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘तू सर्वांशी बोलतोस का ?’’ तेव्हा आमच्यात पुढील संवाद झाला.
मी : मला व्यवस्थित बोलता येत नाही. ‘माझ्या बोलण्याने इतरांना अडचण येईल’, असे मला वाटते.
प.पू. डॉक्टर : तू सगळ्यांशी बोलले पाहिजेस. तरच तुझ्यातील न बोलण्याचा अडथळा निघून जाईल. समजा, तू बोलण्यास चुकलास, तर होऊन होऊन काय होईल ? फारतर तुला त्याची जाणीव करून दिली जाईल; पण हा दोष तुझ्यात रहायला नको.

३ ई. प.पू. डॉक्टरांनी साधकातील अहंचे निर्मूलन करणे

एकदा रामनाथी आश्रमातील चौथ्या मजल्यावर बांधकाम चालू असतांना सायंकाळी तेथील शेष राहिलेले सिमेंट कामगारांनी इतरत्र कुठेही टाकू नये; म्हणून मी ते घेऊन पहिल्या मजल्यावर घेऊन जात होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टर तेथून जात होते. तेव्हा ‘आता मला मी ‘काय करत आहे ?’ असे विचारून ते माझे कौतुक करतील’, असा तीव्र अपेक्षेचा विचार माझ्या मनात येऊ लागला. एवढ्यात प.पू. डॉक्टरांनी तेथे बाजूला पडलेला पुठ्ठ्याचा एक तुकडा दाखवून मला विचारले, ‘‘हे उचलायचे लक्षात आले नाही का ?’’

३ उ. अनुसंधान असल्यासच देव चुका लक्षात आणून देत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

एकदा मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीमध्ये त्यांच्याशी बोलत होतो. तेव्हा तिथे २ साधक मंत्रपठण करत होते. त्या वेळी प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आपले बोलणे चालू असतांना आपल्या बोलण्याने मंत्रपठणामध्ये अडथळा आला. मंत्रपठण करणार्‍या २ साधकांपैकी एकाने मागे वळून पाहिले.’’ त्यांनी सांगितल्यावर हे माझ्या लक्षात आले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपले अनुसंधान असेल, तर देवच आपल्याला आपल्या चुका लक्षात आणून देतो.’’

३ ऊ. साधकाला होणारे त्रास नष्ट होणार असल्याविषयी आश्वस्त करणे

वर्ष २०१० मध्ये मी घरी गेलो होतो. तिथून परत आल्यावर मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीमध्ये सेवा करत असतांना ते म्हणाले, ‘‘तुझे वाईट शक्तींशी प्रतिदिन सूक्ष्मयुद्ध चालू असते. एकदा त्या जिंकतात, तर एकदा तू जिंकतोस. जेव्हा त्या जिंकतात, तेव्हा तू घरी जातोस आणि जेव्हा तू जिंकतोस, तेव्हा तू आश्रमात येतोस. शेवटचे सूक्ष्मयुद्ध तूच जिंकणार आहेस.’’

३ ए. त्रासांच्या संदर्भात साधकाला आलेली अनुभूती

वर्ष २०१३ मध्ये मला भिंतीवर अनेक चित्रविचित्र आकार दिसत. ते कधी स्त्रीचे किंवा भुतांचे आकार असत. त्यानंतर काही दिवसांमध्ये असे आकार दिसणे बंद होऊन देवतांचे आकार, उदा. श्रीकृष्ण-अर्जुन रथ अशी चित्रे आकाशामध्ये किंवा भिंतीवर दिसू लागली. (ही अनुभूती परमपूज्य डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘छान अनुभूती आहे. लिहून दे.’’ मला ती लिहून देण्यास विलंब झाला. नंतर दिसायचे बंद झाले आणि मी लिहून दिले नाही.)

३ ऐ. प.पू. डॉक्टरांनी आध्यात्मिक त्रासामुळे साधकाची ७० ते ८० टक्के साधना व्यय होत असली, तरी त्याची प्रगती होत असल्याचे सांगून काळजी न करण्यास सांगणे

डिसेंबर २०१४ मध्ये प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुझी प्रगती होत आहे. तुला काही जाणवते का ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘अधोगतीच होत असल्यासारखे वाटत आहे.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘प्रगती होत आहे. त्रासामुळे आतापर्यंत तुझी ७० ते ८० टक्के साधना व्यय (खर्च) झाली. इतरांप्रमाणे तुझीही प्रगती झालेली दिसली असती; परंतु काळजी करू नकोस.’’

३ ओ. मुलांनी लग्न न करण्याविषयीचे साधकाच्या आईचे विचार ऐकल्यावर प.पू. डॉक्टर आणि प.पू. पांडे महाराज यांनी साधकाच्या आईचे कौतुक करणे

वर्ष २००६ मध्ये माझी आई मिरज आश्रमातून रामनाथी आश्रमामध्ये काही दिवस रहाण्यासाठी आली होती. त्या वेळी तिने मला लग्नाविषयी माझे मत विचारले आणि मला सांगितले, ‘‘लग्न न केलेले चांगले. लग्न करून काही लाभ होत नाही.’’ दुसर्‍या दिवशी प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘आई तुला काय म्हणाली ?’’ त्या वेळी मी त्यांना मला आईने सांगितलेले वाक्य सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘प्रतिदिन सकाळी मला चुका ऐकायला मिळतात; मात्र आज तू मला आनंदाचे वृत्त दिलेस. अशी आई मिळाल्याने तुम्ही दोघे (मी आणि माझी बहीण कु. रूपाली) भाग्यवान आहात. इतरांचे आई-वडील मात्र ‘कधी एकदा मुलांचे लग्न लावून त्यांना मायेत ढकलता येईल’, असा विचार करतात !’’

त्यानंतर काही दिवसानंतर मी सेवेसाठी देवद आश्रमात गेल्यावर तेथे प.पू. पांडे महाराज यांनी मला ‘‘तुझा पुढचा काय विचार आहे ?’’, असे विचारल्यावर मी त्यांना वरील प्रसंग सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘खरी साधना तुझ्या आईलाच कळली. तिला माझा साष्टांग नमस्कार सांग.’’

(समाप्त)

– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२०)