फुटबॉल विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव झाल्याने फ्रेंच नागरिकांकडून हिंसाचार

पॅरिस (फ्रान्स) – फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केल्यानंतर फ्रान्सच्या नागरिकांनी पॅरिसमध्ये हिंसाचार केला. त्यांनी वाहनांती तोडफोड करण्यासह ठिकठिकाणी जाळपोळ केली. अन्य शहरांमध्ये काही प्रमाणात अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांसमवेत नागरिकांची चकमकही उडाली.

केरळमध्ये एकाचा मृत्यू

केरळच्या कन्नूर येथेही फ्रान्सच्या पराभवावरून फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्या समर्थकांमध्ये हिंसाचार झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ जण घायाळ झाले. त्यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले होते. ही घटना पल्लियामूला येथे घडली. या प्रकरणी ६ जणांना कह्यात घेण्यात आले आहे. कोच्चि आणि थिरूवनंतपूरम् येथेही हिंसाचाराच्या घटना घडल्या. या दोन्ही ठिकाणी पोलीस अधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचा हिंसाचार करून स्वतःच्याच देशाच्या संपत्तीची हानी करणारे कोणते देशप्रेम दाखवत आहेत ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !