मुंबई – अमेरिकेमध्ये त्यांच्या देशाच्या झेंड्याच्या रंगाचे अंतर्वस्त्र तुम्ही परिधान करू शकता; पण भारतात अशा प्रकारचे कपडे परिधान करण्यास मान्यता नाही. भगवा रंग एका धर्मासाठी किती महत्त्वाचा आहे, हे गाणे बनवणार्याला माहीत नाही का ? असा प्रश्न ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या अर्धनग्न अवस्थेतील अश्लील नृत्याविषयी मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला.
सौजन्य: ABP NEWS
याविषयी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘शिवसेना आणि रा.स्व. संघ दोघांचा ध्वज भगवा आहे. आजच्या पिढीतील मुले टीव्ही आणि चित्रपट पाहून मोठी होतात. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने अशा प्रकारच्या गाण्यांना मान्यता देऊ नये. चित्रपट परिनिरीक्षण मंडळ काही सर्वोच्च न्यायालय नाही की, ज्याला आपण विरोध करू शकत नाही. आपला देश काही ‘स्पेन’ नाही की, जेथे अशा प्रकारची गाणी प्रदर्शित होतील. आता अर्धे कपडे परिधान करून गाणी प्रदर्शित केली जात आहेत. काही काळानंतर कपडे परिधान न करताच गाणी सिद्ध केली जातील.’’