‘कोस्टल रोड’च्या वादावर तोडगा, खांबांतील अंतर वाढवणार !

मुंबई – मागील ५ वर्षांपासून ‘कोस्टल रोड’साठी समुद्रात बांधण्यात आलेल्या खांबांमधील अंतर वाढवण्यासाठी स्थानिक मासेमार समाजाकडून मागणी करण्यात येत होती; मात्र यावर निर्णय होत नसल्यामुळे स्थानिकांकडून या मार्गाला विरोध करण्यात येत होता. यामध्ये राज्यशासनाने हस्तक्षेप करून ‘कोस्टल रोड’मधील खांबांतील अंतर ६० मीटरऐवजी १२० मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील वरळी येथून समुद्रातून जाणार्‍या ‘कोस्टल रोड’मध्ये एकूण ११ खांब असणार आहेत. आतापर्यंत यांतील ५ खांब उभारण्यात आले आहेत. खांबांतील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यांतील खांब तोडावे लागणार आहेत.  खांबांतील अंतर न्यून असल्यामुळे समुद्रात बोटी घालण्यास अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे स्थानिक कोळी बांधवांनी हे अंतर २०० मीटर करण्याची मागणी केली होती. तज्ञांशी चर्चा केल्यानंतर खांबांतील अंतर १२० मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी पर्यंत एकूण १०.५८ किलोमीटर हा सागरी मार्ग बांधण्यात येत आहे.