गुन्हेगार जरी एक आफताब, तरी ओळखा विकृतांचा पूर !

१. तथाकथित पुरोगाम्यांनी समाजविघातक प्रकरणाचा सोयीप्रमाणे अर्थ लावून विरोध करणे

‘श्रद्धा वालकर हिचा क्रूर आणि विकृत मानसिकतेने बळी घेतला. या प्रकरणावर चर्चा चालू होती, तेव्हा तथाकथित पुरोगामी लिब्राडू (उदारमतवादी) आणि स्वत:ला विचारवंत समजणारे पत्रकार अत्यंत वाईट पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबचा बचाव करत होते. ते ‘गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे’, हे वाक्य तोंडदेखले बोलतात; पण त्यानंतर ते लगेच सूत्र उपस्थित करतात की, ‘हे वैयक्तिक प्रकरण आहे’, ‘हे दोन व्यक्तींमधील प्रकरण आहे. त्याला धर्माचे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही’, ‘याला व्यापक करायची काही आवश्यकता नाही’ इत्यादी. असे प्रकरण जेव्हा उलट बाजूने घडते, तेव्हा यांची प्रतिक्रिया काय असते ? उदा. दादरीला अखलाक हत्या प्रकरण घडल्यावर प्रचंड अवडंबर माजवले गेले. अखलाक प्रकरणाच्या वेळी ‘मुसलमानांचे ‘मॉब लिंचिंग’ (सामूहिक हत्या) कसे होते’, ‘भारतातील मुसलमान घाबरले आहेत’, अशी ओरड करण्यात येत होती. त्या वेळी ‘हा त्या गावचा प्रश्न आहे. त्याचा एवढा बाऊ कशाला करता ?’, असे कुणीही म्हटले नाही.

आंध्रप्रदेशमध्ये रोहित वेमुला याने आत्महत्या केली होती; पण त्याला दलितांच्या हत्येचे स्वरूप दिले गेले. रोहित वेमुला हा कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाच्या विद्यार्थी शाखेचा कार्यकर्ता होता आणि ‘एस्.एफ्.आय.’ (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) या संघटनेत तो काम करत होता. त्याने पत्र लिहून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुकाणू समितीमध्ये (पॉलीट ब्युरोमध्ये) दलित का नाही ?’, असा प्रश्न विचारला होता. ते बाजूला ठेवून त्याच्या मृत्यूसाठी थेट पंतप्रधान मोदी सरकारला उत्तरदायी ठरवण्यात आले होते. वास्तविक त्या वेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू होते. आपल्याकडे घटना कुठेही घडली, तरी त्याचा सोयीप्रमाणे अर्थ लावला जातो. आफताबला अटक झाली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे समजूया; पण हे प्रकरण येथेच संपत नाही. त्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍या या विकृतींचे काय करायचे ? समुद्राच्या लाटेप्रमाणे तथाकथित पुरोगामी अचानक बोलू लागतात. भाजपच्या राज्यात अल्पसंख्यांक किंवा दलित यांच्या विरोधात घटना घडली असेल, तर या सर्वांचे हिंदूंच्या विरोधातील रक्त उसळी मारून वर येते. लगेच मेणबत्त्या लावत रस्त्यावर, तसेच ‘ट्विटर’वर निषेध चालू होतो. आता एका हिंदु मुलीचा बळी गेला; म्हणून सर्व पुरोगामी नेते आणि त्यांचे समर्थक यांचे ‘ट्विटर’ खाते किंवा ‘फेसबुक’ पेज यांवर जाऊन बघा, सगळीकडे सामसूम आहे.

श्री. श्रीकांत उमरीकर

२. सामाजिक माध्यमांमुळे मुख्य प्रवाहातील डाव्या विचारसरणीच्या माध्यमांना पत्रकारितेचा अजेंडा (विषयसूची) चालवता न येणे

पूर्वीप्रमाणे आता माध्यमांची एकाधिकारशाही उरलेली नाही. एकेकाळी एखाद्या घटनेतील क्रौर्य आणि सर्व बारकावे दडवून ठेवणे अन् ते सोयीप्रमाणे समोर आणणे माध्यमांना शक्य होते. तशी व्यवस्था काम करत होती. डाव्यांचे एक धोरण असायचे. ही ‘लॉबी’ (प्रचारगट) प्रत्येक क्षेत्रात काम करत होती. आता सामाजिक माध्यमांचा काळ आहे. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट लपवायची असली, तरी लपवता येत नाही. माध्यमांमध्ये बसलेल्या लोकांना वाटत असेल की, आफताब-श्रद्धा हे प्रकरण त्यांना दाबता येईल, तर तसे त्यांना करता येणार नाही, तसेच आफताबचे क्रौर्यही लपवता येणार नाही.

३. जुन्या गोष्टींना कवटाळून बसल्याने मुसलमानांचा विकास खुंटणे

इस्लामच्या मध्ययुगीन कालखंडातील मागासलेपणाचा आधुनिकतेशी कसा संघर्ष चालू आहे ?, याविषयी आतिश तासिर या तरुण मुसलमान पत्रकाराने सांगितले आहे. आतिश तासिर याने स्वत:च्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात लिहिले आहे की, इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेविरुद्ध चालू आहे. सर्व जुनाट गोष्टींशी कवटाळून बसलेल्या आणि विकासान्मुख (विकासाकडे पाठ केलेला) झालेल्या समाजाचा विकास होऊ शकत नाही. ही खंत ज्यांना आधुनिकतेचे वारे लागले आहे, असे मुसलमान तरुण व्यक्त करत आहेत आणि आपल्याकडील तथाकथित लिब्राडू त्यांना परत जुन्या मानसिकतेत ढकलत आहेत.

४. श्रद्धाचे तुकडे करणार्‍या आफताबचा मुसलमानांनी सामूहिकपणे निषेध करायचे टाळणे

जेव्हा कधी या प्रकरच्या उलट घटना घडल्या, तेव्हा त्या माथेफिरूचे समर्थन करण्यासाठी हिंदु समाज कधीही रस्त्यावर आलेला नाही. उत्तरप्रदेशातील विकास दुबे चकमकीत मारला गेला, तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याची तिकडेच विल्हेवाट लावायला सांगितले होते. याउलट ‘एक समूह’ म्हणून भारतातील मुसलमान आधुनिकता का दाखवत नाहीत ? काही वैयक्तिक पातळीवर निषेध करणारे लोक आहेत; पण सर्व मुसलमान संघटनांनी श्रद्धाचे तुकडे करणार्‍या आफताबचा ठामपणे निषेध केला, असे का घडत नाही ? ‘सर तन से जुदा’ (डोके शरिरापासून वेगळे करणे) या घोषणेसाठी सहस्रो लोक रस्त्यावर येतात, तेव्हा त्यावर आक्षेप का घेतला जात नाही ? यामुळे सर्वाधिक हानी मुसलमान समाजातील तरुण-तरुणींची होत आहे.

५. गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यासह जिहाद्यांना पाठिंबा देणार्‍या विकृत मानसिकतेचा वैध मार्गाने बंदोबस्त होणे आवश्यक !

श्रद्धाचे तुकडे झाल्यावर त्या हत्येचे ज्या पद्धतीने हे लोक समर्थन करत आहेत, त्याचे काय करायचे ? ही अडचण आहे. देशात १५-२० कोटी लोकसंख्या असलेल्या समाजाची अशी मानसिकता रहाणार असेल, तर ते वाईट आहे. शरिराचा एक अवयव सडत असेल, तर त्याचा परिणाम उर्वरित शरिरावरही होईल. त्यामुळे मुसलमानांच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करता येत नाही. भारतीय मुसलमानांची तुलना इतर मुसलमानांशी करता येत नाही. जगभरातील मुसलमान भारतीय मुसलमानांना त्यांचे समजत नाहीत. भारतीय मुसलमानांवरील हिंदु चालीरितींचा प्रभाव अजूनही गेलेला नाही. ‘हिंदु ही जीवनपद्धती आहे’, असे असेल, तर त्याप्रमाणे भारतात रहाणारे हे सर्व हिंदू ठरतात. भारतातील मुसलमानांचे प्रश्न हे शरीयत आदी कायद्यांनी सुटू शकणार नाहीत.

गंगा जमुनीची ज्यांची अंधश्रद्धा ।
तुकड्यात ‘श्रद्धा’ विखुरली ।। १ ।।

इस्लाम दोषीला नसतोच धर्म ।
ओळखा हे वर्म लिब्राडूंचे ।। २ ।।

गुन्हेगार जरी एक आफताब ।
ओळखा सैलाब (पूर) विकृतांचा ।। ३ ।।

अजूनी आठवे त्यांना अखलाक ।
हिंदूंची हो राख आठवेना ।। ४ ।।

सोयीने चालतो लिब्राडू अजेंडा ।
पुरोगामी झेंडा फडफडे ।। ५ ।।

भानावर या हो ओळखा ही खेळी ।
श्रद्धा गेली बळी हकनाक।। ६ ।।

कांत म्हणे पुरे । पुष्कळ झाले आता ।
कायद्याच्या लाथा हाणाव्यात ।। ७ ।।

आपल्याकडे न्यायदानाची प्रक्रिया अतिशय हळू चालते. ‘विलंबाने मिळालेल्या न्यायाला न्याय म्हणता येत नाही’, असे म्हटले जाते. या सर्व प्रकरणात गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊन तातडीने आणि कठोरपणे न्याय झाला पाहिजे. अशा प्रकरणाला पाठिंबा देणार्‍या विकृत मानसिकतेचा वैध मार्गाने बंदोबस्त केला पाहिजे.’

– श्री. श्रीकांत उमरीकर, ज्येष्ठ पत्रकार, ‘ॲनालायझर’ यू ट्यूब वाहिनी.