‘२५.५.२०२० या दिवशी रात्री ९.३० ते १० या वेळेत ‘निर्गुण’ हा नामजप चालू करण्यापूर्वी सौ. दुर्गेशाने (पत्नीने) प्रार्थना सांगितली. नंतर मी जप करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर २ – ३ मिनिटांनी माझा नामजप थांबला आणि मला पुढील दृश्य दिसले.
१. सूक्ष्मातून दिसलेले दृश्य
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी येत आहेत. त्यांना आणण्यासाठी आम्ही खाली प्रवेशद्वाराजवळ गेलो आहोत. प्रवेशद्वारापासून ते उद्वाहकापर्यंत (लिफ्टपर्यंत) फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत.
१ आ. परात्पर गुरुदेवांनी घर पाहून त्यांनी ‘घरामध्ये चैतन्य भरपूर आहे; पण ते ग्रहण करायला हवे’, याची जाणीव करून देणे : त्यानंतर ते तिघे उद्वाहकातून आमच्या सदनिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आले. सौ. दुर्गेशा आणि आमच्या शेजारी रहाणार्या दोन महिलांनी त्या तिघांना पंचारतीने ओवाळले. ते तिघेही घरात आले. नंतर परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘माझे स्थान कुठे आहे ?’, ते मला पहायचे आहे.’ ते स्वतः एका खोलीत गेले. गेले. तेथे कपाटावर ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ हे ग्रंथ ठेवले आहेत. आम्ही त्यांची प्रतिदिन पूजा करतो. त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी घर फिरून पाहिले आणि मला म्हणाले, ‘घरामध्ये वारा भरपूर आहे. चैतन्यसुद्धा भरपूर आहे; पण ते ग्रहण करायला हवे.’
१ इ. तिन्ही गुरु बैठकीवर बसल्यावर त्यांचे पाद्यपूजन करणे : त्यानंतर तिन्ही गुरु बैठकीवर बसले. त्या वेळी परात्पर गुरुदेव श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे पाहून म्हणाले, ‘या साक्षात् श्री महालक्ष्मी आहेत.’ त्यानंतर ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे पाहून म्हणाले, ‘या साक्षात् श्री महासरस्वती आहेत.’ त्यानंतर आम्ही तिन्ही गुरूंचे पाद्यपूजन केले. आम्ही त्यांच्या चरणांखाली चौरंग आणि त्यावर ताम्हन ठेवले. आम्ही त्यांच्या चरणांवर उष्णोदक घातले आणि त्यांच्या चरणांना हळद-कुंकू लावून फुले वाहिली.
१ ई. परात्पर गुरुदेवांनी ‘मी सर्वांना घेऊन जाणारच आहे’, असे सांगणे : त्यानंतर मी परात्पर गुरुदेवांना म्हणालो, ‘आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्व जण तुमचे दोन शब्द ऐकण्यासाठी आतुरले आहेत.’ तेव्हा ते म्हणाले, ‘मी आणखीन काय सांगणार ? जो साधना करेल, तो तरेल. येणारा काळ भीषण आहे. न्यूनतम हात-पाय हलवायला तरी यायला हवेत. मी सर्वांना घेऊन जाणारच आहे.’
१ उ. तिन्ही गुरु वाहनामध्ये बसल्यावर क्षणार्धात ते वाहन आकाशाकडे झेपावणे आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागणे : त्यांचे भोजन झाल्यानंतर तिघेही जायला निघाले. आम्ही त्यांना नमस्कार केला. परात्पर गुरुदेवांनी सदर्याच्या खिशातून शंभर रुपयांची नवीन नोट काढून माझ्या हातात दिली. मी म्हणालो, ‘मी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला हवी. तुम्ही मला कसे काय देता ?’ तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, तुझा मुलगा माझ्याकडे आहे; म्हणून मी तुला देत आहे.’ त्यानंतर तिन्ही गुरूंसह आम्ही उद्वाहकामधून खाली प्रवेशद्वारापर्यंत गेलो. तिन्ही गुरु बाहेर असलेल्या वाहनामध्ये बसले. त्यानंतर क्षणार्धात ते वाहन आकाशाकडे झेपावले आणि गोव्याच्या दिशेने जाऊ लागले. तिन्ही गुरु वरून हात हलवत होते आणि आम्हीही त्यांना हात हलवून निरोप देत होतो.’
१ ऊ. माझ्या डोळ्यांसमोर हे प्रसंग आपोआपच येत गेले. हे दृश्य मला पंचवीस मिनिटे दिसत होते
२. भानावर आल्यावर हलकेपणा जाणवून आनंद होणे
त्यानंतर मी भानावर आलो. मला हलकेपणा जाणवला आणि आनंद झाला. मागील दोन दिवसांपासून मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी ‘माझ्या मनात येणार्या प्रत्येक विचारामधून मला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होऊ दे. मी करत असलेली प्रत्येक कृती आणि माझा प्रत्येक श्वास यांमध्ये तुमचे अस्तित्व मला जाणवू दे’, अशी प्रार्थना करत होतो.
‘आम्हाला परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून दर्शन दिले’, त्याबद्दल आम्ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. रणजित लोखंडे, कोल्हापूर (२६.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |