भारत कंबोडियातील अंकोरवाट मंदिराचा जीर्णाद्धार करत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

कंबोडियातील अंकोरवाट मंदिर – या मंदिराचा जीर्णोद्धार भारत करणार आहे !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – मंदिरे आमची संस्कृती आणि इतिहास यांचे रक्षक आहेत. मोदी सरकारचे लक्ष संपूर्ण जगातील भारताच्या समृद्ध परंपरांच्या पुनर्निर्माणाकडे आहे. भारताची संस्कृती अनेक देशांत पसरली आहे. या अनुषंगाने भारत कंबोडियातील अंकोरवाट मंदिराचा जीर्णोद्धार करत आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथे आयोजित ‘काशी तमिल संगम्’मध्ये ‘समाज आणि राष्ट्र निर्माणामध्ये मंदिरांचे योगदान’ याविषयावर बोलतांना दिली.

 (सौजन्य : StudyIQ IAS)

एस्. जयशंकर पुढे म्हणाले की,

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

१. आपल्या मंदिरांची उपेक्षा करण्याचा काळ आता मागे पडला आहे. आता इतिहासाचे चक्र फिरले असून पुन्हा भारताचा उदय होत आहे. आमचे सरकार संपूर्ण जगात भारतीय संस्कृती आणि वारसा यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.

२. मी काही वर्षे चीनमध्ये राजदूत राहिलो होते. तेथील पूर्वेकडील भागात मी हिंदूंच्या मंदिरांचे अवशेष पाहिले आहेत. कोरिया आणि अयोध्या यांच्यातही विशेष संबंध आहेत आणि तेथील लोक ते टिकवून ठेवू इच्छित आहेत.

३. जागतिक स्तरावर मंदिरांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेत १ सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत. विदेशात साडेतीन कोटी हिंदु आहेत.  त्यांनी तेथे आपली संस्कृती नेली आहे आहे आणि ते प्रतिदिन संस्कृतीनुसार वागत आहेत.

४. नेपाळमध्ये ‘रामायण सर्कीट’ बनवण्यासाठी आमच्या सरकारने २०० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. श्रीलंकेतील मन्नार येथील थिरूकेतीश्‍वरम् मंदिराचाही भारताने जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर गेल्या १२ वर्षांपासून बंद होते.

५. मंदिर केवळ श्रद्धा आणि पूजा यांचे स्थान नाही, तर ते सामाजिक केंद्र, सभा, ज्ञान अन् संस्कृती यांचेही केंद्र आहे. ते कला आणि शिल्प यांचे प्रवर्तक आहेत. ते आर्थिक केंद्रही आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मंदिरे आपला वारसा आणि इतिहास सांगणारी केंद्रे आहेत. मंदिरे आमच्या जगण्याची पद्धत आहेत.