सोलापूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सोलापूर अन् जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर ते २ जानेवारी हे ५ दिवस होम मैदान येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून २०० हून अधिक शेती विषयक आस्थापनांचा यात सहभाग असणार आहे, अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रतिवर्षी सिद्धेश्वर यात्रेच्या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते; परंतु होम मैदान येथे मर्यादित जागेत हे प्रदर्शन भरवण्यास अडचणी येतात. त्यामुळे यंदा यात्रेच्या पूर्वी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीविषयी मार्गदर्शन करणारी दालने, रेशीम शेती आणि मधुमक्षिका पालन, तांदूळ महोत्सव, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे, देशी ५०० हून अधिक बियाणांचे प्रदर्शन आणि विक्री, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन यांसह विविध ३०० हून अधिक आस्थापनांचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत शेतीविषयक मार्गदर्शनासाठी ३ दिवस चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर
पत्रकार परिषदेला सर्वश्री शेतकी समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सिद्रामप्पा बमणी, तसेच नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, अधिवक्ता आर्.एस्. पाटील, विजयकुमार बरबडे, सोमनाथ शेटे, कृषी उपसंचालक माने आदी मान्यवर उपस्थित होते.