संभाजीनगर-वैजापूर रस्त्याची दुर्दशा पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे !

संभाजीनगर-वैजापूर रस्त्याची झालेली दुर्दशा !

संभाजीनगर – सुप्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते प्रशांत दामले हे ११ डिसेंबर या दिवशी येथील संत एकनाथ रंगमंदिरात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर ते संभाजीनगर येथून नाशिक येथे प्रयोग करण्यासाठी शिऊर बंगल्यामार्गे निघाले होते. संभाजीनगर-वैजापूर रस्त्यावरून प्रवास करत असतांना त्यांना या रस्त्यावर बरेच खड्डे आणि रस्त्याची दुर्दशा पहायला मिळाली. त्यानंतर त्यांनी उपहासात्मक टीका करत संभाजीनगरच्या विकासाचे वाभाडे काढले. प्रशांत दामले यांनी संभाजीनगर-वैजापूर प्रवासाच्या वेळी आलेला अनुभव आपल्या फेसबुकवरून प्रसारित केला आहे. प्रशांत दामले फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, ‘‘आज संभाजीनगरचे दोन्ही प्रयोग खणखणीत झाले. रसिकांना धन्यवाद….! अतिशय स्वादिष्ट; पण थंड जेवण आनंदाने जेवलो. (उपाहारगृह बंदच आहे म्हणून) मग निघालो. संभाजीनगर-वैजापूर रस्ता असा आहे. त्यामुळे जेवण आपोआप पचले’’, अशी उपहासात्मक टीका करत त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

संपादकीय भूमिका

दिवसेंदिवस सर्वत्रच्या रस्त्यांची दुरवस्था होणे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?