पिंपरी (जिल्हा पुणे) – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवर सत्ताधार्यांच्या दबावाखाली पोलिसांनी चुकीचे गुन्हे नोंद केले असून ते मागे घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य संघटना यांनी चिंचवड गावातील चापेकर चौकातून पिंपरी न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्च्याचा मार्ग आणि न्यायालय परिसर येथे कडेकोट बंदोबस्त होता. मोर्चा चापेकर चौकातून पोलीस आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार होता; मात्र शाईफेक प्रकरणातील तीनही संशयितांना न्यायालयात उपस्थित करणार असल्याने ऐनवेळी मोर्च्याच्या मार्गात पालट करण्यात आला. महिलांचा मोर्चा ‘चिंचवड स्थानक ऑटो क्लस्टर’मार्गे, तर पुरुषांचा मोर्चा ‘चिंचवड स्थानक मोरवाडी चौक’मार्ग न्यायालयासमोर पोचला. न्यायालयाबाहेरील रस्त्यावर मोर्चेकर्यांनी ठाण मांडून निदर्शनेही केली. त्यात पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर मोर्च्याचा समारोप झाला.