चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन !

समता सैनिक दल संघटनेचे २ कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी-चिंचवड सचिवांना अटक

पुणे – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर १० डिसेंबर या दिवशी शाईफेक केल्याप्रकरणी मुख्य आरोपी समता सैनिक दलाचे संघटक मनोज घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय ईचगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओवाळ यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ‘कोणत्याही पोलिसांवर कारवाई करू नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही’, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती; मात्र आता या घटनेनंतर ११ पोलिसांचे निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी, तर ३ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रकरणात एका पत्रकारालाही अटक केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणार्‍या २ व्यक्तींसह हा पत्रकारही सहभागी झाला होता. ठरवून शाई फेकीचे चलचित्र प्रसारित करण्यात आले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.