आयुर्वेदाचा लौकिक वाढवणारी जागतिक आयुर्वेद परिषद

गोव्यात चालू असलेल्या नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या निमित्ताने…

विज्ञान भारती, आयुष मंत्रालय आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथे कला अकादमी परिसरात नववी जागतिक आयुर्वेद परिषद चालू आहे. ८ ते ११ डिसेंबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या या परिषदेमुळे जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा लौकिक वाढण्यास साहाय्य होणार आहे.

भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद ही मुख्य उपचारपद्धत असेल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद

१. नवव्या जागतिक आयुर्वेद परिषदेची ठळक वैशिष्ट्ये

वैद्य मेघराज पराडकर

अ. ‘एक आरोग्य (वन हेल्थ)’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे. ‘केवळ माणसाच्याच नव्हे, तर सर्व चराचर सृष्टीच्या आरोग्यासाठी आयुर्वेद कसा उपयोगी आहे’, हे या परिषदेत मांडले जात आहे. ‘पशू आयुर्वेद (प्राण्यांसाठीचा आयुर्वेद)’ या विषयावरही या परिषदेत चर्चा होत आहे.

आ. यामध्ये ३५ हून अधिक देशांतील ५ सहस्रांहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यांतील ५०० हून अधिक प्रतिनिधी विदेशातून आले आहेत.

इ. १५० हून अधिक प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन या वेळी ४ विविध सभागृहांमध्ये होत आहे.

ई. आयुर्वेदाशी संबंधित साधारण ४०० विक्रीकेंद्रे (स्टॉल्स) उभारण्यात आली आहेत.

उ. नागरिकांसाठी नाडीपरीक्षण, वेदनाशमन यांसारख्या ७ विशेष विषयांवर विनामूल्य चिकित्सालये या ठिकाणी आहेत. यांमध्ये विनामूल्य औषधे दिली जात आहेत.

ऊ. ३ लाखांहून अधिक लोक या ठिकाणी भेट देणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.

२. परिषदेच्या स्वागतगीतामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या औषधी वनस्पती लागवड प्रकल्पाची नोंद

परिषदेच्या निमित्ताने येणार्‍या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी एक लघुपट बनवण्यात आला होता. या लघुपटामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा ‘औषधी वनस्पती लागवड प्रकल्प’ही दाखवण्यात आला. हा लघुपट परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सर्वांना दाखवण्यात आला. गोव्यात काही ठिकाणी बागायतींमध्ये काही प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे; परंतु मोठ्या प्रमाणात केवळ औषधी वनस्पतींची लागवड असलेला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा प्रकल्प एकमेव आहे.

३. परिषदेच्या आयोजनामध्ये गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाचा विशेष सहभाग

शिरोडा, गोवा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाने या परिषदेच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परिषदेपूर्वी जनजागृतीसाठी झालेल्या सर्व उपक्रमांमध्ये महाविद्यालयाने सक्रीय सहभाग घेतला होता. आताही परिषदेच्या ठिकाणी आयोजन आणि चिकित्सालये यांमध्ये आयुर्वेद महाविद्यालयाचे तज्ञ वैद्य काम पहात आहेत.

४. गोव्यामध्ये शासकीय स्तरावरील आयुर्वेदासंबंधीच्या सुविधा

अ. गोव्यातील बहुतेक सर्व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुर्वेदाची चिकित्सालये आहेत. या ठिकाणी रुग्णांना आयुर्वेदाची औषधे विनामूल्य दिली जातात. जागतिक आयुर्वेद परिषदेच्या ठिकाणी देण्यात येणार्‍या उपचारांच्या आढाव्यांसाठी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आयुर्वेद विभागांत किंवा शिरोडा, गोवा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये जाऊ शकतात.

आ. आयुष मंत्रालयाच्या वतीने गोव्यामध्ये आणखी ४२ ‘आरोग्य केंद्रे (आयुष वेलनेस सेंटर)’ चालवली जाणार आहेत. यामध्ये लोकांना योग आणि आयुर्वेद यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

५. जागतिक आयुर्वेद परिषदेमुळे आयुर्वेदाची महती सर्वदूर पोचत असतांना आयुर्वेदाला कलंकित करणार्‍यांना आवर घालणेही आवश्यक !

जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये आयुर्वेदावर शास्त्रीय चर्चा होत आहे. विविध संशोधन पत्रिका या परिषदेत मांडल्या जात आहेत. या परिषदेमुळे आयुर्वेदशास्त्राची महती जगात सर्वदूर पसरत आहे; परंतु अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर आयुर्वेदाला हीन लेखण्याचे कार्य चालू आहे. ‘विकीपीडिया’ या जागतिक विश्वकोशामध्ये आयुर्वेदाला ‘खोटे शास्त्र (स्यूडो सायन्स)’ म्हटले आहे आणि याला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा संदर्भ देण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक वेळा जागरुक वैद्यांनी हे पालटण्याचा प्रयत्न केला; परंतु आयुर्वेदाची अपकीर्ती करण्याच्या एकमात्र उद्देशाने हा पालट विकीपीडियाकडून स्वीकारला जात नाही. भारत शासनाने कायदेशीर कारवाई करून त्यांना हा पालट करण्यास भाग पाडायला हवे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२२)