‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – नागपूर शहरात ‘मेट्रो फेज २’चे भूमीपूजन आणि नाग नदीच्या शुद्धीकरणाचे काम केले जाणार आहे. ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या दोन्ही कामांना आरंभ केला जाणार आहे. बाळासाहेब समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात लव्ह जिहादच्या कायदाच्या दृष्टीने अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याविषयी राज्य सरकारची सिद्धता चालू !

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारची सिद्धता चालू असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याच्या सरकारच्या हालचाली चालू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. श्रद्धा वालकर हिच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत होण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी याआधी केली होती. त्याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र सरकारने चाचपणीही चालू केली आहे. हा कायदा संमत झाल्यानंतर महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे रोखण्यास आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास साहाय्य होईल’, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

सरकार ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करत असेल, तर स्वागत आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

उत्तरप्रदेश, गुजरात आणि अन्य राज्याप्रमाणे जर महाराष्ट्र राज्य सरकार ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करत असेल, तर त्याचे स्वागत आहे. आम्ही कित्येक दिवसांपासून या कायद्याची मागणी करत आहोत. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू होणे ही काळाची आवश्यकता आहे आणि राज्य सरकार तसा विचार करत आहे, ही समाधानाची गोष्ट असून याचा मला आनंद आहे.