नवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

(दैनिक सनातन प्रभात मधील बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

नवी मुंबई, ६ डिसेंबर (वार्ता.) – योग्य देखभालीअभावी वाशीतील ‘सेंटर वन मॉल’समोरील महिला सुलभ शौचालयाची दुरवस्था झाल्याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ६ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले होते. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याची त्वरित नोंद घेत या ठिकाणची स्वच्छता केली.

जनतेला प्रवासाच्या दरम्यान सहजरित्या प्रसाधनगृहे (सुलभ शौचालय) उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची स्टेनलेस स्टीलची सुलभ शौचालये शहरात उभारण्यात आलेली आहेत; मात्र त्यांच्या देखभालीचे दायित्व शौचालयाच्या जुन्या कंत्राटदाराने सोडून दिले होते. हे काम सध्या अस्तित्वात असलेल्या अन्य शौचालयांच्या कंत्राटदारांकडून करवून घेतले जाते; परंतु त्याच्याकडूनही दुर्लक्ष झाले. परिणामी या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. या शौचालयांच्या देखभालीसाठी अद्याप नवीन कायमस्वरूपी कंत्राटदार नेमण्यात आलेला नाही.

‘पैसे भरा आणि वापरा’ या तत्त्वावर असलेल्या या शौचालयांच्या पैशाच्या पेट्या फोडून चोरट्यांनी पुरती वाट लावली होती. अखेर पालिकेने चोरट्यांच्या पुढे हात टेकून काही ठिकाणची शौचालये विनामूल्य वापरास खुली केली.

संपादकीय भूमिका

  • सुलभ शौचालये कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था ठेवली, तरच जनतेला त्या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो !
  • स्वच्छतेचे दायित्व झटकणार्‍या पूर्वीच्या आणि नव्या महापालिका कंत्राटदारांवर काय कारवाई करणार ?, हेही स्पष्ट झाले पाहिजे !
  • कंत्राटदारांनी स्वच्छतेचे काम केले आहे कि नाही, हे न पहाणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी  यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !