वाशीतील महिला सुलभ शौचालयाची दुरवस्था

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई, ५ डिसेंबर (वार्ता.) – स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिला क्रमांक यावा आणि लोकांना उघड्यावर लघुशंका करायला लागू नये, यासाठी कोट्यवधी रुपयांची स्टेनलेस स्टीलची सुलभ शौचालये शहरातील अनेक ठिकाणी उभारली आहेत. ‘पैसे भरा आणि वापरा’ या तत्त्वावर उभारण्यात आलेल्या यांतील काही शौचालयांची दुरवस्था झाली आहे. वाशीतील ‘सेंटर वन मॉल’समोरील अशाच एका महिला शौचालयाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.

हे शौचालय तुंबले आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे, तसेच वॉश बेसिनमध्ये बाटल्या आणि अन्य कचरा आहे. शौचालयाच्या वायरी उघड्यावर आहेत. शौचालयाच्या या दुरवस्थेमुळे महिला या शौचालयाचा वापर करू शकत नसल्याचे आढळून आले. परिणामी या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कोट्यवधी रुपये पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार्‍या महापालिकेने या मूलभूत सुविधांकडेही वेळीच लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

अभियांत्रिकी विभागाकडून बसवण्यात आलेल्या या शौचालयांच्या कंत्राटदाराकडे त्यांची देखभाल करण्याचे काम होते. नंतरच्या काळामध्ये या शौचालयांची दुरवस्था वाढत चालल्याने कंत्राटदाराच्या नाकीनऊ आले. त्याने यातून अंग काढून घेतले. परिणामी शहरातील अशा अनेक ‘पैसे भरा आणि वापरा’ तत्त्वावर उभारण्यात आलेल्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे.

संपादकीय भूमिका

शौचालयांच्या देखभालीचे दायित्व कंत्राटदाराकडे असतांना त्याच्याकडून ते होत नसेल, तर महापालिका कारवाई का करत नाही ? कंत्राटदाराकडून स्वच्छता होत नसेल, तर त्यावर अन्य उपाययोजना महापालिकेने आतापर्यंत का शोधली नाही ?