नाशिकचे जिल्हाधिकारी सुरगाणा गावी, तर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुजरात येथील तहसीलदारांना निवेदन दिले !

सीमावर्ती गावे इतर राज्यांत समाविष्ट होण्याचे प्रकरण

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुजरात येथील तहसीलदारांना निवेदन दिले

नाशिक – महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतील गावांनी कर्नाटक, तेलंगाणा आणि गुजरात राज्यांत जाण्याची चेतावणी दिल्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत परिसरात उद्योगमंत्री उदय सामंत कर्नाटक सीमेवरील गावांना भेटी देत आहेत, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गुजरात येथे जाऊन ‘गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावांना गुजरात राज्यांत समाविष्ट करून घ्यावे’, अशी मागणी गुजरात सरकारकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी गुजरात राज्यातील वासदा येथील तहसीलदारांना दिले आहे.

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरात येथे जाण्याच्या सूत्रांवर ठाम असून ते थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र सरकारकडे वारंवार मागणी करूनही वीज, पाणी, रस्ते आणि आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी हा उठाव केला.