नागपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित !

उद्धटपणे आणि अनैतिकपणे वागणारे अधिकारी अन् त्यांना वाचवणारे वरिष्ठ अधिकारी यांना बडतर्फ करून कायमचे घरी पाठवा. असे अधिकारी सरकारी विभागात काम करण्याच्या पात्रतेचे आहेत का ?

नागपूर – महिला कर्मचार्‍यांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, कनिष्ठ सहकार्‍यांना धमकावणे आणि सतत दहशतीचे वातावरण निर्माण करणे या कारणांवरून जिल्ह्यातील वरोरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम्.पी. राठोड यांना ३ डिसेंबर या दिवशी निलंबित करण्यात आले. राठोड यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ सहकार्‍यांच्या वरील तक्रारी होत्या. तरीही त्यांना वाचवण्याचे काम वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले; मात्र याचा कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याने कर्मचारी संघटनेने अखेर कामबंद आंदोलनाची चेतावणी दिली. त्यामुळे चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्र.ज. लोणकर यांनी राठोड यांच्या निलंबनाचे आदेश काढले. (प्रथम तक्रारी केल्यानंतर राठोड यांना लोणकर यांनी का निलंबित केले नाही ? कर्मचार्‍यांच्या तक्रारींचे गांभीर्य नाही कि त्यांना अधिकार्‍यांचे वर्तन योग्य वाटत होते ? – संपादक)