महाराष्ट्रातील ४ महानगरांमध्ये ‘जी २०’ परिषदेच्या १४ बैठका होणार !

मुंबई – ‘जी २०’ परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यांतील १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होतील. याविषयी २ डिसेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या वेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी ‘जी २०’ परिषदेच्या काळात होणारे विविध कार्यक्रम आणि त्यांची सिद्धता यांविषयी सादरीकरण केले. १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे रहाणार आहे. या अंतर्गत होणार्‍या बैठकांच्या नियोजनासाठी महाराष्ट्रात ४ अधिकार्‍यांची समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

देशाचा आणि राज्याचा जगात नावलौकिक करण्यासाठीची ही संधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देशाचा आणि आपल्या राज्याचा जगात नावलौकिक करण्यासाठी ही संधी आहे. त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर देण्यात येईल. रस्त्यांची दुरुस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई यांवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचे चित्र पालटावे. आपले राज्य आणि शहर यांचे जगात ‘ब्रँडींग’ करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा.

आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘जी २०’ परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की, २० वर्षे ते मिळत नाही. त्यामुळे भारत देश आणि महाराष्ट्र यांचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिक, विविध संस्था आणि संघटना यांनाही सहभागी करून घ्यावे.