मुंबई – जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. उपसा सिंचन योजना आणि गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात जत तालुक्यातील प्रश्नांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या वेळी आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि तेथील पदभरती, शिक्षकांची पदभरती, शाळांसाठी निधीसाठीची तरतूद या संदर्भात जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रस्ताव सिद्ध करावेत, तसेच या भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांविषयी विभागांनी कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगांव या तालुक्यात द्राक्ष अन् डाळींब यांच्या बागांचे सिंचन करण्यासाठी भारनियमनाच्या वेळांमध्ये सवलत देण्याच्या दृष्टीने वीजवितरण आस्थापनांना निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.